एकेकाळी RSSमध्ये होता मिलिंद सोमण; आता केलं चकीत करणारं वक्तव्य

बसला ना तुम्हालाही धक्का? 

Updated: Mar 10, 2020, 06:49 PM IST
एकेकाळी RSSमध्ये होता मिलिंद सोमण; आता केलं चकीत करणारं वक्तव्य  title=
एकेकाळी RSSमध्ये होता मिलिंद सोमण; आता केलं चकीत करणारं वक्तव्य

मुंबई : भारताचा 'आयर्न मॅन', 'मिस्टर फिटनेस' अशी ओळख असणाऱ्या अभिनेता मिलिंद सोमण Milind Soman याची अनेक रुपं चाहत्यांच्या मनाचा विशेष ठाव घेणारी. त्याच्या चाहत्यांध्ये महिलांची संख्या तुलनेने जास्त. असं असलं तरीही पुरुषांसाठीसुद्धा तो अनेकदा मैलाचे दगड प्रस्थापित करुन गेला आहे. असा हा अभिनेता, मॉडेल आणि दमदार व्यक्तीमत्वासाठी ओळखला जाणारा मिलिंद सोमण एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही भाग होता. 

बसला ना तुम्हालाही धक्का? 'Made in India: A Memoir by Milind Soman with Roopa Rai' या पुस्तकात मिलिंदच्या जीवनातील या टप्प्याचा उलगडा करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्विमिंग (जलतरण) आणि अर्थातच हे सारं घडणारं ठिकाण या गोष्टी मिलिंदच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यात तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावून गेल्या. 

स्विमिंग आणि संघाची स्थानिक शाखा ही (मुंबईच्या) शिवाजी पार्क भागातील. त्यातच शिस्तबद्ध जीवनशैली, शारीरिक सुदृढता, सुयोग्य विचारसरणी या साऱ्यावर मिलिंदच्या वडिलांचा विश्वास होता. परिणामी तो संघाचा एक भाग झाला. त्याच्या शेजारीपाजारी राहणाऱ्यांपैकीही अनेकांनी ही वाट धरली होती. अगदी शिवाजी पार्कमध्ये घडणाऱ्या काही रुढींप्रमाणे. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असतानाच्या काही आठवणी सांगत मिलिंदने या शाखेचा आपल्या जीवनावर कशाप्रकारे परिणाम झाला, ही बाबही स्पष्ट केली. त्याच्यासाठी आरएसएस ही संकल्पना वेगळी आणि तितकीच प्रगल्भ होती. याचविषयी सांगताना त्याने म्हटलं आहे, 'आज मी जेव्हा त्यांच्याविषयी विध्वंसक आणि जातीय वाचक वृत्त पाहतो तेव्हा मात्र मी चकीत होतं. कारण, दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत आमच्या शाखेत जे काही व्हायचं ते अगदीच वेगळं होतं. आम्ही खाकी पँटमध्ये संचलन करायचो, योगासनं करायचो, मोकळ्या हवेत असणाऱ्या पारंपरिक व्यायामशाळेत कोणत्याही आधुनिक साहित्याशिवाय व्यायाम करायचो, गाणी गायचो, संस्कृत पद्य म्हणायतो ज्याचा अर्थ तेव्हा आम्हाला कळत नव्हता. आपल्या आवडत्या मित्रांसमवेत काही खेळही खेळायचो.'

भविष्यात एक चांगला नागरिक होण्यासाठीची शिकवण, शारीरिक शिक्षण (आरएसएसच्या) शाखेत दिलं जायचं ही बाब त्याने काही उदाहरणांसह अधोरेखित केली. सोबतच शाखेतील वरिष्ठांनी कधीच त्यांची मतं आपल्यावर लादला नाही हेसुद्धा त्याने न विसरता नमूद केलं. किंबहुना आपण, असं काही असल्यास या गोष्टींवर लक्षच दिलं नसतं हेसुद्धा मिलिंदने सांगितलं. अनेक वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यातून दिली जाणारी राष्ट्र घडवण्याची शिकवण ही आजच्या दिवसांमध्ये कुठेतरी नाहीशी होतानाच दिसत असल्याचा एकंदर सूर मिलिंदच्या या अनुभवांतून व्यक्त झाला. 

राजकीय वर्तुळातही संघाच्या विचारसरणीला असणारं महत्त्वं, त्यातच त्यांच्या शिकवणीला मिळणारं राजकीय वळण पाहता आपल्या पाहणीतील आणि अनुभवातील संघ शाखा काही औरच होती, असंच मिलिंदने सांगण्याचा प्रयत्न केला. .