3 हजार 269 कोटी रुपयांचा मालक आहे हा कुत्रा? Netflix वरील डॉक्युमेंट्रीमधून उलगडणार त्याच्या संपत्तीचं रहस्य

एका जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या नावावर एवढी संपत्ती कशी काय, असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. विशेष म्हणजे ही संपत्ती वारसा हक्काने आल्याबद्दलच्या चर्चेचबद्दल ऐकून नक्कीच धक्का बसेल.

Updated: Jan 11, 2023, 03:34 PM IST
3 हजार 269 कोटी रुपयांचा मालक आहे हा कुत्रा? Netflix वरील डॉक्युमेंट्रीमधून उलगडणार त्याच्या संपत्तीचं रहस्य title=
German Shepherd gunther vi net worth usd 400 million (Photo - Twitter)

Gunther VI Net Worth: एखाद्या कुत्र्याच्या नावे चार कोटी डॉलर्स म्हणजेच 3 हजार 269 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. बरं त्यातही अधिक गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे ही संपत्ती या कुत्र्याच्या मालकीची नसून मागील तीन दशकांपासून त्याच्या पूर्वजांकडून पिढीजात पद्धतीने त्याच्याकडे आल्याचं सांगितलं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? अर्थात हे सारं वाचून तुम्हाला ही एखादी काल्पनिक कथा वाटू शकते किंवा उगाच कोणीतरी आपल्याला गंडवण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटू शकतं. मात्र तुम्ही नुसतं Gunther VI असं गुगल केलं तर या कुत्र्यासंदर्भातील सर्च किती मोठ्या प्रमाणात केला जातो याचा अंदाज तुम्हाला येईल.

'नेटफ्लिक्स'वर गंथरसंदर्भातील सीरीज

गंथर सिक्स नावाचा हा कुत्रा जगातील सर्वाधिक संपत्ती असलेला कुत्रा आहे. केवळ श्रीमंतीच नाही तर या संपत्तीमुळे या कुत्र्याला प्रसिद्धीही मिळाली आहे. या कुत्र्याच्या संपत्तीवर 'नेटफ्लिक्स'ने एका डॉक्युमेंट्री सीरीज (Netflix documentary) तयार केली आहे. एक फ्रेबुवारी रोजी ही सीरीज रिलीज होणार आहे. मात्र या कुत्र्याची गोष्ट खरी आहे की खोटी? खरोखर या कुत्र्याकडे इतकी संपत्ती आली कुठून आणि कशी? याबरोबरच या कुत्र्यासंदर्भातील दाव्यांवर प्रकाश टाकण्याचा या सीरीजचा प्रयत्न आहे. तुम्ही Gunther VI असं गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला असे अनेक लेख मिळतील ज्यामध्ये हा कुत्रा सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे की नाही या दाव्याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली आहे. याच डॉक्युमेंट्रीच्या पार्श्वभूमीवर हा गंथर सिक्स प्रकार आहे तरी काय आणि त्याची खरी गोष्ट काय आहे यावर नजर टाकूयात...

गंथरच्या संपत्तीची चर्चा नेमकी कधीपासून?

गंथर सिक्सच्या मालकाचं नाव मॉरिजियो मियाँ असं आहे. इटलीमध्ये वास्तव्यास असलेली ही व्यक्ती एका मोठ्या औषध कंपनीचा उत्तराधिकारी आहे. तसेच मॉरिजियो एक रिअल इस्टेट एजंटही आहे. मात्र या क्षेत्रामध्ये मॉरिजियो यांनी आपलं सम्राज आपल्या कुत्र्याच्या संपत्तीच्या जोरावर उभं केल्याची शक्यताही व्यक्त केली जाते. गंथर हा कुत्रा सर्वात आधी रिअल इस्टेटसंदर्भातील बातम्यांमुळेच चर्चेत आला होता. १९९९ साली अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामधील वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या एका बातमीने अनेकांची झोप उडवली होती. "काउंटेस कारलोटा लिएबिस्टेन यांनी नावावर संपत्ती केलेल्या गंथर या जर्मन शेफर्ड कुत्र्याने स्टेलॉन (प्रसिद्ध अमेरिकी अभिनेते सिलव्हेस्टर स्टेलॉन) यांचं आलिशान घर खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे," असं या बातमीत म्हटलं होतं. हा व्यवहार 'गंथर कॉर्प' नावाच्या कंपनीच्या माध्यमातून होणार होता. ही कंपनी या कुत्र्याला वारस म्हणून मिळाल्याचं सांगण्यात आलेलं. एका कुत्र्याच्या नावाने एवढा मोठा व्यवहार होणार असल्याच्या बातमीने अनेकांचं लक्ष वेधलं. मियाँ यांनी, "तुम्हाला ही मस्करी वाटत असली तर मी याबद्दल काही बोलणार नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती.

मियाँ यांची वेवेगळी विधानं

कुत्र्याने घर विकत घेण्यासंदर्भातील या चर्चेमागील सत्य लगेचच समोर आलं. लोकांनी मियाँ यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देण्यास सुरुवात केली. मियाँ यांनी १९९५ साली इटलीमधील वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींमध्ये गंथर कॉर्प आणि गंथर फाउंडेशनच्या विचारांची चर्चा व्हावी म्हणून या कथेला नव्याने जन्म देण्यात आल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच ही संपत्ती मियाँ यांच्याकडून खरेदी केली जाणार होती. मात्र गंथरचं नाव केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात आलं. मात्र मियाँ यांनी १९९९ साली आपलेच हे विधान खोडून काढलं. प्रसारमाध्यमांना दूर लोटण्यासाटी मी असं स्पष्टीकरण दिलं होतं असं मियाँ म्हणाले.

या कुत्र्याला संपत्ती देणारी माहिला कोण?

मियाँ यांनी दिलेल्या माहितीनुसार गंथरला त्याची संपत्ती जर्मनीची काउंटेस (फार श्रीमंत व्यक्ती किंवा राजाची पत्नी/विधवा) कारलोट लिएबिंस्टेन यांच्याकडून मिळाली. कारलोट यांचा मृत्यू १९९२ साली झाली. कारलोट यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याचं नाव हे गंथर थ्री असं होतं. मात्र अशा कोणत्याही श्रीमंत महिलेसंदर्भात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर जर्मनीमध्ये त्यावेळी अशी कोणतीही काउंटेस नव्हती जी आपली एवढी संपत्ती कुत्र्याच्या नावे करण्यास सांगेल. मियाँ यांच्याकडे गंथर कॉर्प आणि फाउंडेशनसंदर्भात विचारण्यात आलं असता कोणतंही ठोस उत्तर दिलं नव्हतं.

कुत्र्याच्या नावानेच उभं केलं सम्राज्य

वर सांगितल्याप्रमाणे मियाँ रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये आहे. त्यांनी गंथरच्या नावानेच रिअल इस्टेटमध्ये मोठं सम्राज्य उभं केलं आहे. मागील ३० वर्षांमध्ये मियाँ यांनी अनेक ठिकाणी जागा विकत घेतल्या आणि विकल्या आहेत. 'नेटफ्लिक्स'च्या सीरीजमध्ये गंथरच्या नावाने मियाँ यांनी पॉप स्टार मडोनाचं आलीशान घरही विकत घेतल्याचं म्हटलं आहे.