मुंबई : बॉलिवूड सेलिब्रेटी आणि अफेअर्स यांचे जवळचे नाते आहे. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगतात.
त्यापैकी एक गाजलेले अफेअर म्हणजे रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोण. यांचे आता ब्रेकअप झाले असले तरी रणबीर आणि दीपिकाची मैत्री कायम आहे. इतकंच नाही तर रणबीरच्या पालकांशी अर्थात नीतू आणि ऋषी कपूर यांच्याशीदेखील दीपिकाचे चांगले संबंध आहेत.याचा प्रत्यय देणारी अजून एक घटना समोर येत आहे.
अनेक वादातून जात अखेर दीपिकाचा पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा अनेकांच्या पसंतीस उतरला. बॉलिवूड मंडळी, दीपिकाच्या चाहत्यांनी दीपिकाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या स्पेशल शोसाठी नीतू आणि ऋृषी कपूर यांनीही उपस्थिती लावली होती. दीपिकाच्या कामाने प्रभावित झालेल्या या दोघांनी तिला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी तिला थेट पुष्पगुच्छ पाठवला. त्यात त्यांनी 'तुझं काम मनापासून आवडलं. आम्हाला तुझा अभिमान वाटतो,' असा संदेशही दिला. खुद्द दीपिकाने या पुष्पगुच्छाचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला.
मात्र यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. रणबीर-दीपिकाचे नाते पुन्हा नवे वळण घेईल का, अशी आशा त्यांच्या चाहत्यांना वाटू लागली आहे.