प्रियंका चोप्राने घेतली दिलीप कुमार यांची भेट

किंग खान शाहरूख खान पाठोपाठ आता बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 5, 2017, 08:32 PM IST
प्रियंका चोप्राने घेतली दिलीप कुमार यांची भेट  title=

मुंबई : किंग खान शाहरूख खान पाठोपाठ आता बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली आहे. 

प्रियंकाने दिलीप कुमार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्याशी तिनं काही वेळ गप्पाही मारल्या. दिलीप कुमार यांचे मित्र फैजल फारकी यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरून या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत. 'प्रियांका चोप्राने साहेब व सायरा बाजीसोबत आजची संध्याकाळ व्यतीत केली. 

साहेबांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्या संबंधित सर्व माहिती सोशल मीडियावर वेळोवेळी शेअर करू,' असं फारकी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. फारकी यांच्या ट्विटला प्रियांकानंही लगेचच उत्तर दिलं आहे. 'तुम्हा दोघांना भेटून खूप छान वाटलं. धन्यवाद! साहेबांची प्रकृती स्थिर आहे हे बघून छान वाटलं,' असं तिनं म्हटलं आहे.

डिहायड्रेशनचा त्रास होत असल्यामुळं ९४ वर्षीय दिलीप कुमार यांना मागच्याच महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून अनेक दिग्गज त्यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस करत आहेत.