'मला सर्व कपडे काढायला...' शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी रडत राहिलो'

'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिजमुळे अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यानिमित्ताने मुलाखतींमध्ये तो अनेक गोष्टींचा उलगडा करत असून जुने किस्से सांगत आठवणींना उजाळा देत आहे.   

शिवराज यादव | Updated: May 6, 2024, 08:02 PM IST
'मला सर्व कपडे काढायला...' शेखर सुमनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी रडत राहिलो' title=

'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिजमुळे अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान यानिमित्ताने शेखर सुमन आपल्या करिअरमधील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशाच एका मुलाखतीत त्याने 'उत्सव' चित्रपटाच्या सेटवर कशाप्रकारे शशी कपूर आणि गिरीश कर्नाड यांच्यामुळे आपण रडू लागलो होतो याचा खुलासा केला आहे. या दोन्ही अभिनेत्यांनी शेखर सुमनसह प्रँक केला होता. दोघांनीही शेखर सुमनला तुला एका सीनमध्ये न्यूड व्हावं लागेल असं सांगितलं होतं. 'उत्सव' चित्रपटाचं दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. शशी कपूर या चित्रपटाचे निर्माते होते.

Honestly Saying पॉडकास्टमध्ये शेखर सुमनने सांगितलं की, "शशी कपूर आणि गिरीश कर्नाड यांनी माझ्यासह एकदा प्रँक केला होता. कारण 'उत्सव' हा एक कामुक चित्रपट होता, ते म्हणाले, 'लव्ह मेकिंग सीनदरम्यान तुला तुढा पार्श्वभाग दाखवावा लागेल. त्यांनी मला सांगितलं की सीनमध्ये मी खिडकीसमोर उभा असतो आणि मग चालत येतो तेव्हा थोडासा नग्न असतो. मी रडायला लागलो आणि म्हणालो की मी न्यूड सीन करू शकत नाही. तेव्हाच शशी कपूर आणि गिरीश कर्नाड हसू लागले आणि आपण मस्करी करत असल्याचं सांगितलं".

शेखर सुमनने यावेळी चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान रेखा यांनी आपला मुलगा अध्ययन सुमनला हातात उचलून घेतल्याचंही सांगितलं. "रेखा यांनी माझ्या मुलाला उचललं होतं. तो त्यांचे कपडे सतत ओढत होता. आम्हाला फार वाईट वाटत होतं. पण त्यांना यामुळे काहीच फरक पडत नव्हता," असं शेखर सुमन यांनी सांगितलं. 

दरम्यान एका मुलाखतीत शेखर सुमनने जेव्हा आपण एकत्र काम करत होतो, तेव्हा माधुरी दिक्षितला बाईकवरुन पिकअप करायचो असा खुलासा केला होता. शेखर सुमनने सांगितलं की, "उत्सव चित्रपटाला विलंब झाला होता. यादरम्यान मला मानव हत्या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा फोन आला. चित्रपटात मला एका पत्रकाराची भूमिका निभवायची होती".

शेखर सुमनने सांगितलं की, "दिग्दर्शकाने सांगितलं की, माझ्याकडे पैसे फार कमी आहेत. त्याने फक्त 5 हजारांची ऑफर दिली. मला त्यावेळी उत्सव चित्रपटासाठी 25 हजार रुपये मिळाले होते. मला 10 हजार आधीच देण्यात आले होते. जेव्हा मला 5 हजारांची ऑफर दिली, मला थोडं वाईट वाटलं होतं. त्यांना चित्रपटासाठी हिरोईनही मिळाली नव्हती. त्यांनी मला माधुरी नावाची नवी हिरोईन असल्याचं सांगितलं. मी तिची भेट घडवून देण्यास सांगितलं. मला त्यांनी चित्रपट करणार का असं विचारलं असता मी होकार दिला".

पुढे त्याने सांगितलं की, "मी नक्कीच चित्रपट करेन असं सांगितलं. जर रेखाजी मी नवा असतानाही माझ्यासोबत काम करु शकतात तर मी एका नव्या अभिनेत्रीसोबत काम का करु शकत नाही असा विचार केला. आम्ही माधुरी दीक्षितच्या घरी जाऊन भेट घेतली. तिने बाहेर येण्यासाठी थोडा वेळ घेतला. जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा ती तेजस्वी आणि सुंदर दिसत होती. मी दिग्दर्शकाला सांगितले की तुमचा चित्रपट सुरू होणार आहे आणि मी तो करीन ".