ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं निधन

ते ६१ वर्षांचे होते. 

Updated: Dec 19, 2018, 09:18 AM IST
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं निधन  title=

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं बुधवारी सकाळी कोल्हापूरात निधन झालं आहे. ते ६१ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. जुने आणि नवे चित्रपट यांना जोडणारा दुवा म्हणून भालकर यांची ओळख आहे. 

बुधवारी सकाळी कलासृष्टीत मोलाचं योगदान  देणाऱ्या या कलाकाराने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्य़ानंतर भालकरांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  'पैज लग्नाची', 'राजमाता जिजाऊ' हे त्यांचे चित्रपट गाजले होते. 'पैज लग्नाची' या चित्रपटासाठी त्यांना १४ पुरस्कारही जाहीर करण्यात आले होते. 

कुटुंबाकडूनच त्यांना चित्रपट विश्वात काम करण्याचा वारसा मिळाला. जयप्रभा स्टुडिओत भालजी पेंढारकर यांच्या तालमीत तयार झाले. वेशभूषा विभागात परिटापासून तर चित्रपटाच्या दिग्दर्शनापर्यंतची सगळी कामं केलेला एक हरहुन्नरी कलावंत म्हणून त्यांची प्रतिमा मराठी चित्रपट सृष्टीत  होती. कोल्हापुरातील सार्वजनिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग असे. रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी काम केलं होतं. 

अल्प परिचय

यशवंत लक्ष्मण भालकर यांचा जन्म १७ एप्रिल १९५७, कोल्हापूरमध्ये झाला होता. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती' आणि शाहिर कोंडके यांच्या ‘सोंगाड्या'मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं.  १९८१ मध्ये ‘डाळिंबी’ चित्रपटापासून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केलं ते पुढील १४ वर्षे सुरुच होतं. १९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. 

'घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, 'राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या 'राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं.