आई होऊन दीदी गायल्या आणि... पुन्हा सारा देश रडला... पाहा आठ तास उभं राहून त्यांनी कोणतं गाणं गायलेलं?

दीदींनी असंच एक गाणं गायलं, ज्यातून त्यांच्यात दडलेलं आईचं मन सर्वांना अनुभवता आलं.

Updated: Feb 6, 2022, 01:15 PM IST
आई होऊन दीदी गायल्या आणि... पुन्हा सारा देश रडला... पाहा आठ तास उभं राहून त्यांनी कोणतं गाणं गायलेलं? title=

मुंबई : लता मंगेशकर कोणासाठी बहीण होत्या, कोणासाठी आधार, कोणासाठी त्यांचं असणंच खूप काही होतं. अशा या समृद्ध गायिकेनं रविवारी (6-2-2022) रोजी जगाचा निरोप घेतला. दीदींचं जाणं म्हणजे धक्का देणारं. त्यांची प्रकृती खालावली तेव्हापासूनच सारा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होत्या. पण, त्या परमेश्वरालाही जणू दीदींच्या आवाजाची अनुभूती हवीशी झाली, आणि दीदींना देवाज्ञा झाली.

गायनासाठी सारं आयुष्य पणाला लावणाऱ्या दीदींनी अनेक विक्रम रचले. त्यांच्या ताना, हरकती आणि आवाजाची कोणालाही सर नाही आणि पुढेही नसेल. प्रत्येक गाण्यात त्या खरोखर जीव ओतत होत्या. कधी गाण्यातून ममता दिसली, तर कधी त्याच आवाजातून पराक्रमाची गाथा कानी आली. 

दीदींनी असंच एक गाणं गायलं, ज्यातून त्यांच्यात दडलेलं आईचं मन सर्वांना अनुभवता आलं. हे गाणं होतं, ए.आर.रहमान यांनी संगीतदिग्दर्शित केलेलं, ‘लुक्का छुपी...’. 'आजा साँझ हुई मुझे तेरी फिकर...' असं म्हणत दीदींनी 'लुका छुपी' हे गाणं गायलं आणि साऱ्या देशाच्या डोळ्यांतून आसवं घरंगळली. 

सुरुवातीला गाण्यासाठी दीदींचा नकार होता. पण, अचानकच राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दीदींना फोन केला आणि त्या या गाण्यासाठी तयार झाल्या. तेव्हापर्यंत गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. गाणं रेकॉर्ड होण्याआधी चित्रीत होणं हे पाहून दीदीही थक्क होत्या. पुढे मेहरांनी त्यांना गाण्याचा संदर्भ सांगितला.

या गाण्यासाठी त्यांनी चार दिवसांचा सराव केला. दीदी चेन्नई दौऱ्यावर गेल्या असताच तिथेच असणाऱ्या संगीतकार ए.आर. रहमान यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन दररोज त्या गाण्याचा सराव करत होत्या. 

रेकॉर्डींगच्या दिवशी त्या माईकसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी तासन् तास हे गाणं गायलं. 'त्या रहमान यांच्याशी बोलल्या आणि माईकपाशी गेल्या. आम्ही तिथेच होतो. त्या तिथे उभ्या होत्या, त्यांची पावलं जमिनीला स्पर्ष करत होती. आम्ही काही फुलं आणि पाण्याची बाटली, तसंच एक खुर्ची त्यांच्यासाठी ठेवली. आठ तासांसाठी गाण्याचं रेकॉर्डिंग चाललं आणि विश्वास नाही बसणार पण त्या 8 तास उभ्याच राहिल्या.' असं मेहरा म्हणाले. 

दीदींनी या गाण्यात जी आर्तता ओतली ती डोळे बंद करुन ऐकताना नकळतच अंगावर काटा येतो. आपली आई आपल्यासाठी किती करतेय... याची जाणीव होते आणि नकळत या दैवी आवाजाने डोळ्यातून अश्रूंचा झरा वाहू लागतो. हीच तर कमाल आहे लता मंगेशकर यांच्या आवाजाची.