चँग मियांगाला लोक 'कोरोना' म्हणून हाक मारतात तेव्हा...

'मी संवेदनशील वागणुकीची अपेक्षा करतो'  

Updated: Mar 22, 2020, 09:16 PM IST
चँग मियांगाला लोक 'कोरोना' म्हणून हाक मारतात तेव्हा... title=

मुंबई : सध्या संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा उदय चीनच्या वूहान शहरातून झाल्यामुळे ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक व अभिनेता चँग मियांगने त्याला आलेला अनुभव सांगितला आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मी संवेदनशील वागणुकीची अपेक्षा करतो असं वक्तव्य त्याने यावेळेस केलं आहे. मुंबईत बाईक वरून जाणाऱ्या दोघांनी मला बघून 'कोरोना' महणून हाक मारली याचा मला अतिशय त्रास झाला असल्याचं तो म्हणाला.

‘बदमाश कंपनी’, ‘सुलतान’, ‘भारत’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ अशा एकापेक्षा चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या चँगचा जन्म भारतात धनबाद येथे झाला आहे. शिवाय त्याच्या कुटुंबातील तीन पिढ्यांचा जन्म देखील भारतातच झाला असल्याचं त्यांने या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. माझे पूर्वज चीनचे असल्याचा खुलासा त्याने यावेळेस केला.

त्यामुळे मला चायनीज म्हणून चिडवायचे असेल तर खुशाल चिडवा फक्त त्यापुढे भारतीय असा शब्द लावा अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे. शिवाय  काही जणांनी चँगला कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवली होती. त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या असल्याचं देखील त्याने सांगितले. 

 चीनमध्ये उदयास आलेलं कोरोना व्हायरसचं धोकादायक वादळ आता वुहानमध्ये शमलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहशत पसरवलेल्या या विषाणूने चीन मध्ये हजारे लोकांचा बळी घेतला आहे. पण आताच्या घडीला वुहानमध्ये एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे ही बातमी संपूर्ण  जगासाठी दिलासादायक ठरणारी आहे.