लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नाही?

संपूर्ण जगभरात हजारो लोकांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. 

Updated: Feb 14, 2020, 01:49 PM IST
लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका नाही?  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली :  संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची (Corona Virus) चर्चा आहे. चीनसह संपूर्ण जगभरातील डॉक्टर, संशोधक या खतरनाक व्हायरसशी लढण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत. पण या संपूर्ण परिस्थितीत एक चांगली माहिती समोर आली आहे. या व्हायरसचा लहान मुलांना धोका नसल्याचं समोर आलं आहे. 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगभरात हजारो लोकांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. पण हा व्हायरस १५ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर कोणताही परिणाम करत नसल्याचं समोर आलं आहे. लहान मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आतापर्यंत अतिशय कमी आकडे समोर आलेत. 

जागतिक आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, (World Health Organization) आतापर्यंत ३५ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांनाच कोरोना व्हायरसची सर्वाधिक लागण झाली आहे. ३५ वर्षांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरोना व्हायरस या वयोगटातील व्यक्तींवर अधिक लवकर हल्ला करतो. परंतु लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांवर लहान मुलं सहजपणे लढतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचा लहान मुलांवर परिणाम होत नसल्याचं बोललं जात आहे.

लहान मुलांना कोरोना व्हायरसचा धोका कमी आहे. परंतु डॉक्टरांकडून मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लहान मुलांना खाताना, बाहेरुन आल्यावर हात स्वच्छ धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच सर्दी, खोकला झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेण्याचं सांगण्यात येत आहे.