लग्नानंतर 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं

बऱ्याचदा लग्नानंतर जोडप्यांमध्ये भांडणं होतात आणि लग्नाच्या काहीच दिवसानंतर अनेक मुली माहेरी निघून येतात.

Updated: Apr 19, 2022, 08:12 PM IST
लग्नानंतर 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं title=

मुंबई : लग्न हा नवरा-बायको दोघांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो, कारण यानंतर त्या दोघांचं ही आयुष्य बदलणार असतं. विशेषता लग्नानंतर खरी तारेवरची कसरत असते ती मुलीची. तिला नवीन घर, नवीन लोक सगळ्या गोष्टींमध्ये स्वत:ला ऍडजस्ट करायचं असतं. लग्न करताना बऱ्याच मुली अनेक इच्छा आणि अपेक्षा घेऊन नवऱ्याच्या घरी जातात. परंतु या सगळ्या गोष्टी पूर्ण होतीलच असे नाही. तसेच लग्नात जोडप्यांना असे वाटते की, माझा जोडीदार माझ्यासाठी सर्व काही करेल, ज्यामुळे मला आनंद मिळतो, परंतु आपण ठरवलेल्या गोष्टी घडतीलच असे नाही. ज्यामुळे बऱ्याचदा लग्नानंतर जोडप्यांमध्ये भांडणं होतात आणि लग्नाच्या काहीच दिवसानंतर अनेक मुली माहेरी निघून येतात.

अशा परिस्थितीत तुम्हाला अशा काही चुकांपासून दूर राहावे लागेल, ज्यामुळे तुमचे नाते बिघडणार नाही. चला जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत, ज्या जोडप्यांनी लग्नानंतर करू नयेत.

कधीही जास्त अपेक्षा ठेवू नका

वास्तविक, लग्नानंतर काही वेळा नात्याच्या सुरुवातीलाच अशा काही चुका घडतात, ज्या अडचणी निर्माण करतात. अशा परिस्थितीत, पहिली चूक म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडण्याची इच्छा ठेवणे. तुम्हाला हे समजले पाहिजे की तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले आहात आणि दोघांचा स्वभावही वेगळा आहे, तसेच दोघांच्या सवयीही वेगळ्या आहेत, त्यामुळे तुमचा जोडीदार तुम्हाला हवय, तसंच वागेल असं नाही. त्यामुळे लग्नानंतर लगेचच जोडीदारामध्ये पर्फेक्ट व्यक्ती शोधू नका. त्याला थोडा वेळ द्या.

जोडीदार आणि कुटुंब यांच्यात संतुलन राखण्यात अपयश

याशिवाय नवीन लग्नानंतर जोडीदार आणि कुटुंब यांच्यात समतोल राखणे खूप अवघड होते. वास्तविक, बहुतेक लोक लग्नानंतरही त्यांचे प्राधान्यक्रम बदलत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो. लग्नानंतर जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

जोडीदाराला तुम्ही काय काम करता आणि त्या ठिकाणी असणारं वर्कप्रेशर हे समजवून सांगा. ज्यामुळे समोरील व्यक्तीला तुम्हाला समजून घेणं सोपं होईल.

याशिवाय महिलांनी विशेषत: लग्नानंतर घरातील सदस्यांशी चांगले वागावे, कारण तुमची सुरुवातीची वागणूकच तुमची प्रतिमा ठरवते.