Bathing Habit: तुम्हाला तर नाही ना अंघोळीच्या चुकीच्या सवयी? पहा योग्य पद्धत

अंघोळ करणं हे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं.

Updated: Feb 9, 2022, 02:23 PM IST
Bathing Habit: तुम्हाला तर नाही ना अंघोळीच्या चुकीच्या सवयी? पहा योग्य पद्धत title=

मुंबई : डोकं दुखत असेल किंवा फ्रेश व्हायचं असेल तर अनेकदा आपण अंघोळीला जाऊन ताण कमी करायचा प्रयत्न करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का अंघोळ करणं हे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. आंघोळीची योग्य सवय लावून घेतल्यास स्ट्रोकसारखा गंभीर धोका टाळता येऊ शकतो, असं हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांचं मत आहे. यासाठी तुम्हाला अंघोळीची योग्य पद्धत आणि त्यामुळे होणारे फायदे जाणून घेतले पाहिजेत.

गरम पाण्याने अंघोळ करणं हृदयासाठी फायदेशीर

हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, टबमध्ये गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तवाहिन्यांच्या कार्य योग्य पद्धतीने होण्यास मदत होते. गरम पाण्याच्या टबमध्ये शरीरातील पाण्याच्या दाबामुळे, हृदयाद्वारे पंप केलेल्या रक्ताचं प्रमाण देखील वाढते, ज्यामुळे हृदय देखील चांगले कार्य करतं.

दररोज अंघोळ केल्याने स्ट्रोकचा धोका कमी

हार्ट जर्नलमध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती दररोज अंघोळ करतात त्यांना हृदयाच्या आजारांचा धोका 28 टक्क्यांनी कमी होत असल्याचं समोर आलंय. या अभ्यासात असंही दिसून आलं होतं की, दररोज अंघोळ केल्यामुळे 26 टक्क्यांनी स्ट्रोकचा धोका कमी होतो. 30 हजार लोकांवर हा अभ्यास करण्यात आला होता

हार्वर्डच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात अंघोळीचे परिणाम शोधून काढले. आधीच्या अभ्यासात रक्तदाब कमी करण्यासाठी आठवड्यातून 4 ते 7 वेळा आंघोळ करण्याचा समावेश होता. 

2018 मध्ये केलेल्या या अभ्यासात, लेखकांना असं आढळून आलं की, आंघोळीमुळे रक्तवाहिन्यांचे कार्य योग्यरित्या होण्यास मदत होते. यामुळे जळजळ कमी होते आणि खराब कोलेस्टेरॉलचे निरोगी कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होतं. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, याचा सर्वांना सारखाच फायदा होईल असं नाही.

हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांना तसंच रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांनी ही सवय लावणं धोक्याचे आहे. तज्ज्ञांनी 70 आणि त्याहून अधिक वयाच्या कमी रक्तदाब असलेल्या लोकांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

तज्ज्ञ म्हणतात, आंघोळीचा एखाद्या व्यक्तीच्या स्ट्रोकच्या जोखमीवर पॉझिटीव्ह परिणाम होतो. या स्थितीवर उपचार न केल्यास ते एखाद्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकतं.