उन्हाळयात घामोळ्यांचा त्रास दूर ठेवतील या '7' खास टीप्स

  उन्हाळा म्हणजे आंबा आणि फणस यांचा मौसम आहे. 

Dipali Nevarekar | Updated: Apr 9, 2018, 09:22 AM IST
उन्हाळयात घामोळ्यांचा त्रास दूर ठेवतील या '7' खास टीप्स  title=

मुंबई :  उन्हाळा म्हणजे आंबा आणि फणस यांचा मौसम आहे. शरीरात उष्णता वाढू नये म्हणून काही सकारात्मक बदल करणं गरजेचे आहे. कारण शरीरातील उष्णता आणि सोबतच तीव्र ऊन यामुळे त्वचेचे नुकसान होते.

उन्हाळ्याच्या दिवसात यामधूनच घामोळ्यांचा त्रास वाढू शकतो. पूर्ण बाह्यांचे कपडे घातले तरीही घामामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात वेळीच घामोळ्यांच्या त्रासाकडे लक्ष दिले नाही तर हिट स्ट्रोकचा त्रास वाढण्याची शक्यता असते. या समस्येमध्ये शरीराचे तापमान संतुलित राखणे कठीण होते. म्हणूनच हा एक्सपर्ट सल्ला नक्की लक्षात ठेवा.

घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी काय कराल ?  

उन्हाळ्याच्या दिवसात सैलसर आणि सुती कपड्यांचा समावेश करा. प्रवास करताना ज्या कपड्यांमध्ये तुम्हांला कम्फर्टेबल वाटेल अशाच कपड्यांची निवड करा. घाम आल्यानंतर ताबडतोब कपडे बदला. उष्णता आणी घामामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता वाढते. त्वचेला रॅश येणे, घाम येणे हा त्रास हमखास वाढतो. 

थेट उष्ण वातावरणात जाणं टाळा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर कष्टदायक व्यायाम करणं टाळा. यामुळे घाम येण्याचं प्रमाण वाढते. तसेच घामोळ्यांचा त्रासही वाढू शकतो. या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !

घराबाहेर पडण्यापूर्वी छातीजवळ, पाठीवर भरपूर घामोळ्यांपासून बचाव करणारी पावडर मारा. घामोळ्यांचा त्रास असलेला भाग थंड आणि शुष्क राहील याची काळजी घ्या. बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा.
तुम्हांला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर /लोशन किंवा बर्फ लावणंदेखील फायदेशीर ठरेल.सनबर्नपासून सुटका मिळवण्याचे 5 सोपे उपाय!

कॅलॅमाईन लोशन किंवा डॉक्टरांनी सुचवलेली सौम्य स्टिरॉईड क्रीम्स त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. पण ऑईल बेस्ड प्रोडक्ट्स वापरू नका. यामुळे खाज किंवा घाम अधिक वाढू शकते.

घामोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी स्टिरॉईड घेणं तुम्हांला त्रासदायक वाटत असेल तर काही घरगुती उपायांची मदत घ्या. मुलतानी माती, चंदन किंवा कडूलिंबाचा पॅक काहीवेळ त्वचेवर लावल्यास थंडावा निर्माण होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात घरच्या घरी ओटमिल पाण्यात मिसळून आंघोळ करणंदेखील फायदेशीर ठरते.  वाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर

नियमित मुबलक पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल.पाण्यासोबतच ताज्या फळांचा रस, ग्लुकोज, व्हिटॅमिन सी युक्त ड्रिंक्स यांचा आहारात समावेश वाढवा. तसेच उन्हाळाचा त्रास टाळण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स , कार्बोनेटेड बेव्हरेजेस पिणं टाळा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.