दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर काय करावं आणि काय नाही? मुलांना 'या' सवयी नक्की शिकवा

पालकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मुलांना दुसऱ्याच्या घरी पाठवताना काही खास गोष्टी शिकवल्या पाहिजे.

Updated: Apr 24, 2022, 03:00 PM IST
दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर काय करावं आणि काय नाही? मुलांना 'या' सवयी नक्की शिकवा title=

मुंबई : मुलं ज्यावेळी इतरांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्याकडून अनेकदा अशा काही चुका होतात, ज्यामुळे लोक त्यांना पुन्हा बोलवण्यास कचरतात. अशा स्थितीत पालकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मुलांना दुसऱ्याच्या घरी पाठवताना काही खास गोष्टी शिकवल्या पाहिजेत. 

पालकांनी मुलांना शिस्तीच्या आणि सभ्यतेच्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत की, जर मुलं दुसऱ्याच्या घरी जात असतील तर त्यांना पालकांनी काय शिकवावं.

न विचारता कोणत्याही गोष्टीला हात लावू नये

घरातील कोणत्याही वस्तूला हात लावण्यापूर्वी मुलं अनेकदा पालकांना विचारत नाहीत. दुसऱ्यांच्या घरी गेल्यावरही मुलं असंच करतात. अशा परिस्थितीत आई-वडील आपल्या मुलाला जर दुसऱ्याच्या घरी पाठवत असतील तर सर्वप्रथम त्याला समजावून सांगा की, कोणत्याही गोष्टीला हात लावण्यापूर्वी मोठ्यांना विचारणं आवश्यक आहे. 

जोर-जोरात बोलू नये

मुलं घरात मोठमोठ्याने ओरडत राहतात किंवा किंचाळत राहतात. अशावेळी आई-वडीलही त्यांचा निरागसपणा लक्षात घेऊन काही बोलत नाहीत. पण ही सवय योग्य नाही. अशा वेळी तुमच्या मुलांना ओरडण्याची सवय असेल, तर त्यांना दुसऱ्याच्या घरी पाठवण्यापूर्वी समजावून सांगा की, कोणाच्याही घरी जाऊन मोठ्याने बोलू नका. 

जे मिळेल तेच खावं

मुलं अनेकदा त्यांच्या घरातील पालकांकडे हट्ट धरतात की, समोर असलेलं त्यांना खायचं नाही. मुलांनी स्वतःच्या घरी करणं सामान्य गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या घरी असं करणं ही चुकीची सवय आहे. अशा परिस्थितीत जे काही मिळेल ते खा, असं आपल्या मुलाला समजावून सांगण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांची हट्ट करण्याची सवय बदला. 

कोणाला मध्येच थांबवून बोलू नये

अनेकदा मुलं कोणाचंही ऐकून न घेता बोलत जातात. अशा परिस्थितीत जेव्हा ते दुसऱ्याच्या घरी जातात तेव्हा या सवयीमुळे ते तिथेच एकतर मोठ्यांना गप्प करून किंवा मध्येच मोठ्यांना थांबवून स्वतःच बोलू लागतात. ही सवयही चुकीची आहे. अशा स्थितीत मोठ्यांचा अनादर होताना दिसतो. पालकांची जबाबदारी आहे की, जेव्हा जेव्हा मुलांना दुसऱ्याच्या घरी पाठवलं जातं तेव्हा त्यांना समजावून सांगावं की, समोरच्याचं संपूर्ण बोलणं संपल्यानंतरच तुम्ही बोललं पाहिजे.

कोणत्याही गोष्टीवरून हट्ट धरणं

अनेकदा मुलं त्यांच्या घरी कोणत्यातरी गोष्टीचा हट्ट धरतात. त्याचबरोबर पालकही त्यांना लहान मुलं समजून तो हट्ट पूर्ण करतात. पण ही सवय त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी कोणाच्या तरी घरी जाऊन आज्ञा पाळणं हे मुलांना शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे.