या '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!

मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Mar 1, 2018, 01:26 PM IST
या '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण! title=

नवी दिल्ली : मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच. पण त्याचबरोबर बोर्डाच्या परिक्षा देखील याच कालावधीत सुरू होतात. या काळात मुलांवरील ताण अगदी नकळत वाढतो. पण परिक्षेत उत्तम कामगिरी करण्यासाठी स्वस्थ असणे गरजेचे आहे. परिक्षेच्या काळात स्वस्थ राहण्यासाठी आणि ताण हाताळण्यासाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.

नियमित व्यायाम

व्यायामामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य राखले जाते, हे आपण जाणतोच. रोज व्यायाम केल्याने मेंदूचाही विकास होतो. स्मरण आणि शिकण्याची क्षमता वाढते. मेंदूला आणि संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर योगासनांचाही खूप फायदा होतो.

संतुलित आहार

जथा अन्नम् तथा मनम् असे म्हटले जाते आणि ते अगदी खरे आहे. विशेषतः परिक्षेच्या काळात ताण कमी होण्यासाठी, शांत-प्रसन्न वाटण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी आहार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आहारात भाज्या, फळे, दूध अशा पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे शरीराला पोषकघटक मिळून शरीर व मन स्वस्थ राहण्यास मदत होईल. 

हर्बल प्रॉडक्सचा वापर

आयुर्वेद आणि आधुनिक अध्ययनानुसार, ब्रह्मी स्मृतिमुळे बुद्धिमत्ता आणि सतर्कता वाढवण्यास मदत होते. हे एक परिणामकारक शक्तिशाली मानसिक टॉनिक आहे. त्यामुळे स्मृती वाढते आणि विचारात स्पष्टता येण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिकरित्या दक्ष राहण्यास मदत होते. या सगळ्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल.

पुरेशी झोप घ्या

परिक्षेच्या काळात योग्य झोप घेणे गरजेचे आहे. अनेकदा विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात आणि रात्रभर जागरण करुन अभ्यास करतात. शारीरिक-मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी कमीत कमी ६-८ तास झोप घेणे गरजेचे आहे. हार्वर्ड विश्वविद्यालयातील एका संशोधनानुसार झोपेचा आणि स्मृतीचा अत्यंत घनिष्ट संबंध आहे.