व्हॅलेंटाईन डे स्पेशल : भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची लव्ह स्टोरी

भारतीय राजकारणात अशी काही प्रेमळ जोडपी आहेत. ज्यांच्या लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा होते. सुचेता कृपलानी आणि आचार्य कृपलानी अशा प्रेमळ जोडप्यापैकीच एक...

Annaso Chavare Updated: Feb 14, 2019, 09:42 AM IST
व्हॅलेंटाईन डे स्पेशल : भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची लव्ह स्टोरी title=

मुंबई: सुचेता कृपलानी. भारतीय राजकारणातील एक वलयांकीत नाव. जे आजही राजकीय वर्तुळात आदराने उच्चारले जाते. सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री. पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची राजकीय कारकिर्दी जशी गाजली तशीच, त्यांची लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली... आजही त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा होते. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुचेता कृपलानींच्या लव्हस्टोरीला पुन्हा एकदा उजाळा.

२० वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत प्रेम

सन १९०८ मध्ये अंबाला येथे बंगाली कुटुंबात जन्मलेल्या सुचेता कृपलानी यांना उच्च दर्जाची बुद्धीमत्ता उपजतच लाभली होती. याच बुद्धीमत्तेवर पुढे समाजकारण, राजकारणात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या सुचेता यांनी दिल्ली आणि लाहोरमधून शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी बनारस हिंदू विद्यापिठात लेक्चररची नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात आचार्य कृपलानी तेव्हा भारतीय राजकारण, समाजकारणात मोठे वलयांकीत आणि दबदबा असलेले नाव होते. समाजवादी नेते असलेले आचार्य कृपलानी हे सुचेता यांच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी मोठे होते. १९३६ सालादरम्यान त्या आचार्य कृपलानी यांच्या संपर्कात आल्या. आचार्य कृपलाणींचे वैशिष्ट्य असे की, ते सर्वसामान्यांपासून असामान्य व्यक्तिमत्वावर सहज आपली छाप सोडीत. अर्थात आचार्य या पदवीवरूनच त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होते.

घरातल्यांचा विरोध पत्करून केला विवाह

सुचेता यांच्यावरही आचार्य कृपलानींचा प्रभाव पडला. जो पुढे हा प्रभाव इतका वाढला की, त्या आचार्यांच्या प्रेमात पडल्या. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, घरातल्यांनी विरोध केला. सुचेता आणि आचार्य कृपलानींना घरातल्यांनी विरोध करण्याचे कारण जातीयता... सुचेता आणि आचार्य दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. सुचेता मुजूमदार तर, आचार्य कृपलानी... दोघांच्या वयातील अंतर हेसुद्धा घरातल्यांच्या विरोधाचे प्रमुख कारण होते. मात्र, दोघांनी घरातल्यांच्या विरोधाला न जुमानता विवाह केला. सुचेता मुजुमदार सुचेता कृपलानी झाल्या. दोघांनी १९३६ मध्ये लग्न केले तेव्हा सुचेता २८ तर आचार्य कृपलानी ४८ वर्षे वयाचे होते. पती-पत्नी म्हणून दोघांच्या वयात तब्बल २० वर्षांचे अंतर होते. पण, हे अंतर त्यांनी वैचारिक पातळीवर कापले, हे महत्त्वाचे... खरेतर बिहारमध्ये आलेला भूकंप त्यांच्या प्रेमाचे कारण बनला. कारण, बिहार भूकंपावेळी काम करत असताना दोघे एकत्र आले व त्यांना एकमेकांबद्धल जाणून घेण्याची संधी मिळाली.

... थेट राजकारणात प्रवेश

सुचेता कृपलानी यांनी आचार्यांसोबत विवीध चळवळींमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली. काही काळाने त्यांनी थेट राजकारणातच प्रवेश केला. सुरवातीच्या काळात उत्तर प्रदेशच्या कामगार मंत्री असेल्या सुचेता अल्पावधीतच उत्तर प्रदेशच्या चौथ्या आणि देशाचील पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. 

स्त्रीवादी नेत्या

सुचेता कृपलाणी महिलांबाबत विशेष संवेदनशील होत्या. त्यांच्या महिलांबाबतच्या संवेदनशीलतेचा एक किस्सा आजही सांगितला जातो. एकदा त्या मुख्यमंत्री असताना एका महिलेने त्यांना सांगितले की, मला सोडून माझा पती विदेशातील त्याच्या प्रेयसीला भेटायला निघाला आहे. तुम्ही माझी मदत करा... यावर संतापलेल्या सुचेता यांनी त्या महिलेच्या पतीचा चक्क पासपोर्टच रद्द केला. भारतीय राजकारणात आजही अशी काही प्रेमळ जोडपी आहेत. ज्यांच्या लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा होते.