Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या

Oral Cancer: तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात.

सुरभि जगदीश | Updated: Apr 30, 2024, 01:13 PM IST
Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित कोणत्या गैरसमजूती मनात असतात? जाणून घ्या title=

Oral Cancer: तोंडाच्या कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात, रोगाभोवती असलेल्या सामान्य समजूतींवर मात करण्यासाठी आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. तोंडाचा कर्करोग हा तोंडाच्या त्या भागांवर परिणाम करतो ज्यात जीभ, गालाचा आतील भाग, वरच्या किंवा खालच्या जबड्याची हाडे, जीभेखालील जागा आणि ओठ यांचा समावेश होतो. 

साताऱ्यातील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रविकुमार वाटेगावकर यांच्या सांगण्यानुसार, तोंडाच्या पोकळीत, ओठ, गाल किंवा जबड्यावर सततच्या जखमा, गाठ, पांढरे किंवा लाल चट्टे पडणे जे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतात हे लक्षण असू शकते. तोंड उघडण्यास त्रास होणे, जबड्याला सूज येणे आणि लाळेवाटे रक्त येणे याचा अर्थ तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.  प्रत्येक रुग्णाला तोंडाच्या कर्करोगाविषयी पुरेपुर जनजागृती केल्यास गैरसमज दूर करता येतात. तोंडाच्या कर्करोगाच्या गुंतागुंतीमुळे अनेकदा निदानास उशीर होतो. उपचारास बिलंब झाल्यास भविष्यात गुंतागुत वाढते.

तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित गैरसमजूती कोणत्या?

डॉ. रविकुमार म्हणतात की, फक्त धूम्रपान करणाऱ्यालाच तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते हा एक गैरसमज आहे. तंबाखू, चुना, खायचे पान, सुपारी, गुटखा आणि मद्यपान यांच्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपान न करताही पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कर्करोग होऊ शकतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे (HPV) सुद्धा तोंडाचा कर्करोग होतो. अनुवांशिक घटक या रोगाच्या विकासास कारणीभूत ठरू शकतात.

तोंडाचा कर्करोग हा तरुणांसाठी चिंतेचा विषय नाही हा एक गैरसमज आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा लैंगिक संक्रमिक व्हायरस आहे. त्याच्या काही प्रकारच्या स्ट्रेनमुळे तरुण लोकांमध्ये वाढत्या संख्येने तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे दिसतात. तोंडाच्या कर्करोगाशी लढण्यासाठी तरुणांनी सतर्क राहणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब लैंगिक संबंध ठेवताना करणं आवश्यक आहे.

तोंडाचा कर्करोगास प्रतिबंध करणे अशक्य आहे हा देखील एक गैरसमज आहे. धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे. आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करणे. यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सुरक्षित संभोगाने देखील एचपीव्ही संसर्गाचा धोका कमी होतो.

तोंडाचा कर्करोग हा लक्षात येण्याजोग्या लक्षणांसह दिसून येतो हा देखील एक गैरसमज आहे. वास्तविकता तोंडाचा कर्करोग काहीवेळा प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत कोणतीही लक्षणे चटकन दिसून येत नाही. जीवनमान सुधारण्यासाठी तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे शोधण्यासाठी नियमित दंत तपासणी करणे आवश्यक आहे.