आजपासून बदलणारे वेगवेगळे ५ नियम, वाचाल तर अडचणीत सापडणार नाही

या वर्षात प्रशासकीय पातळीवर विविध बदल होणार आहेत.

Updated: Jan 1, 2019, 09:34 AM IST
आजपासून बदलणारे वेगवेगळे ५ नियम, वाचाल तर अडचणीत सापडणार नाही title=

नवी दिल्ली - नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात देशात सर्वत्र स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींना मागे सोडत नव्या आशा-आकांक्षासह नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. २०१९ च्या स्वागतासाठी आणि गतवर्षाला निरोप देण्यासाठी विविध ठिकाणी पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. हे सगळं झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपासून बदल काय होणार आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. या वर्षात प्रशासकीय पातळीवर विविध बदल होणार आहेत. ते लवकर समजून घेतले तर ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. 

जाणून घेऊया काय आहेत बदल

१. जर तुम्ही अद्याप जुन्या स्वरुपातील चेकबुक वापरत असाल, तर ते तातडीने थांबवा. कारण आजपासून हे चेक बॅंकांमध्ये स्वीकारले जाणार नाहीत. नव्या सीटीएस स्वरुपातील चेक तुमच्या बॅंकेकडून घ्या आणि तेच वापरा

२. आजपासून जुने मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता येणार नाहीत. हे कार्ड बॅंकांनी बाद ठरवले आहेत. त्यामुळे तुम्हाला बॅंकेकडून नव्या स्वरुपातील चिप असलेले कार्ड घ्यावे लागणार आहे. अनेक ग्राहकांनी चिप असलेल्या कार्डचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काही बदल नाही.

३. आजपासून मारुती, टाटा, फॉक्सवॅगन या कंपन्यांच्या कारच्या किमती वाढणार आहेत.  नवी गाडी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चाट बसू शकतो. या गाड्यांची किंमत ४० हजार रुपयांपर्यत वाढू शकते. 

४. ज्यांनी अद्याप आपले प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) भरलेले नाही. त्यांना आता दंडाची रक्कम म्हणून पाच हजारांऐवजी १० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. ३१ मार्च २०१९ पूर्वी त्यांना प्राप्तिकर विवरण पत्र भरणे आवश्यक आहे.  

५. आजपासून गाडीच्या अपघातासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या विम्याची रक्कम १ लाखाहून थेट १५ लाख करण्यात आली आहे. यामुळे दुचाकी वाहनचालकांना त्यांच्या गाडीचा विमा भरताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आयआरडीएआयने हे निर्देश सर्वच विमा कंपन्यांना दिले आहेत. यासाठी ७५० रुपयांचा अतिरिक्त प्रिमियमही निश्चित करण्यात आला आहे.