'मुस्लीम मुलीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?', हिंदू तरुणाला मारहाण, तरुणीचा ओढला बुरखा

गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका हिंदू (Hindu) तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मुस्लीम मैत्रिणीसह फिरत असल्याने जमावाने त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socil Media) व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 31, 2023, 01:13 PM IST
'मुस्लीम मुलीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?', हिंदू तरुणाला मारहाण, तरुणीचा ओढला बुरखा  title=

मुस्लीम मैत्रिणीसह फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

'जर दुसऱ्यांसोबत फिरायचं असेल तर...', हिंदू मित्रासह फिरणाऱ्या तरुणीला मुस्लीम तरुणांनी घेरलं, VIDEO व्हायरल

 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला 'मुस्लीम तरुणीसह फिरण्याची हिंमत कशी झाली?' अशी विचारणा करताना दिसत आहेत. 

'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल

 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी कारवाई केली असून, तिघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावं अकबर पठाण, फैजन शेख आणि हुसेन सय्यद अशी आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसीमधील वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याआधी सोमवार, 28 ऑगस्ट रोजी, वडोदरा पोलिसांनी मुस्तकीम शेख, बुरहान सय्यद आणि साहिल शेख या तिघांना आंतरधर्मीय जोडप्यांना लक्ष्य करणे, त्यांचा छळ करणे आणि धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्यासाठी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याबद्दल अटक केली होती. 

नंतर, या प्रकरणावर बोलताना, अहमदाबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी एका महिलेला लक्ष्य केलं होतं. ही महिला दुसऱ्या धर्माच्यापुरुषासोबत दिसली असता त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला. पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले असून, सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवले आहेत. 

बंगळुरुतही अशीच घटना

बंगळुरुमध्ये एका मुस्लीम तरुणीशी काही मुस्लीम तरुणांनीच गैरवर्तन केलं. तरुणी आपल्या हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेली होती. जेव्हा ती रस्त्यावर बाईकवरुन खाली उतरली, तेव्हा मुस्लीन तरुणांनी तिला घेरलं आणि वाद घालू लागले. जर तुला इतर कोणासह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा असं यावेळी त्यांनी तिला सुनावलं. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एका आरोपीला अटक केली आहे. 

बंगळुरु पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक केली आहे, त्याचं नाव झाकिर आहे. यानेच बुरखा घालून निघालेल्या तरुणीला दुचाकीवरुन हिंदू तरुणासह का फिरत आहेस? अशी विचारणा करण्यास सुरुवात केली होती. यामुळे मुस्लीम समाजाची बदनामी होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.