कर्जाची परतफेड केल्यानंतर हे काम नक्की पूर्ण करा, अन्यथा...

एकदा का कर्ज पूर्ण फेडलं गेलं की आपलं काम संपलं असं वाटून आपण निर्धास्त होतो, परंतु असं करणं तुम्हाला थोडं महागात पडू शकतं. 

Updated: Jan 12, 2020, 10:07 AM IST
कर्जाची परतफेड केल्यानंतर हे काम नक्की पूर्ण करा, अन्यथा...  title=

मुंबई : हल्लीच्या युगात लोक चांगल्या ठिकाणी घर घ्यायचंय किंवा गाडी घ्यायची असेल तर अशा वेळी विचार केला जातो तो कर्जाचा... तुम्हीही घरासाठी, घराच्या कामासाठी किंवा गाडीसाठी किंवा इतर कारणासाठी कर्ज घेतलं असेल... आणि ते काही वर्षांत पूर्ण फेडलंही असेल... पण, थांबा इथंच तुमचं काम संपत नाही... कर्ज कधी एकदा संपतंय आणि आपली ईएमआयपासून कधी एकदा सुटका होतेय, याची आपण अनेकदा वाट पाहत पाहिलेली असतं. एकदा का कर्ज पूर्ण फेडलं गेलं की आपलं काम संपलं असं वाटून आपण निर्धास्त होतो, परंतु असं करणं तुम्हाला थोडं महागात पडू शकतं.

कर्ज फेडल्यानंतर तुम्ही बँकेकडून 'नो ड्यू सर्टिफिकेट' (NDC) घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे सर्टिफिकेट बँकेकडून घेतलं नसेल तर दुसऱ्यांदा कर्ज घेताना तुम्ही अगोदरच कर्ज पूर्ण फेडलंय हे तुम्ही सिद्ध करू शकणार नाहीत.

नो ड्यू सर्टिफिकेट (NDC)

ग्राहकांनी कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून नो ड्यू सर्टिफिकेट किंवा क्लोझर सर्टिफिकेट दिलं जातं. तुम्ही कर्ज फेडलंय हे बँकेकडून या सर्टिफिकेटद्वारे मान्य केलं जातं. बँकेची अशी कागदपत्रं सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्यांदा कर्ज घेताना क्रेडिट स्कोअरमध्ये तुमचा स्कोअर कमी दाखवला गेला असेल अशा वेळी 'नो ड्यू सर्टिफिकेट' महत्त्वाचं ठरू शकेल.  

अनेकदा बँक स्वत:च ग्राहकांनी कर्ज फेडल्यानंतर त्यांना नो ड्यू सर्टिफिकेट देऊन टाकतात. रक्कम पूर्ण भरल्यानंतर कर्जाचं अकाऊंट आपोआप बंद होतं... आणि बँकेकडून ग्राहकांना आपली कागदपत्रं बँकेतून घेऊन जाण्यासाठी पत्रांद्वारे सूचना दिल्या जातात. परंतु, अनेकदा ही पत्र ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. अशावेळी ग्राहकांनी थेट बँकेशी संपर्क साधावा.

तसंच बँकेतून मिळालेलं नो ड्यू सर्टिफिकेट तुमच्याकडून हरवलं असेल तर डुप्लिकेट एनडीसी मिळवण्यासाठी तुम्ही बँकेकडे विनंती करू शकता. 

जेव्हा तुम्ही कर्जासाठी बँकेशी संपर्क साधता तेव्हा तुम्हाला दोन वर्षांचं बँक स्टेटमेंट मागितलं जातं. यामध्ये एखादा ईएमआय दिसला तर बँक तुमच्याकडे लोन स्टेटमेंटची मागणी करतील. अशावेळी नो ड्यू सर्टिफिकेट तुमच्या कामाला येईल.

ईसी - Encumbrance Certificate 

गृहकर्ज पूर्ण फेडल्यानंतर ईसी अर्थात Encumbrance Certificate वरच मॉर्गेज हटवून अपडेट करावं लागेल. 'ईसी'मुळे तुमच्या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही आणि ते विकता येऊ शकतं, हे सिद्ध करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला क्लोजर लेटरची एक कॉपी घेऊन रजिस्टर ऑफिसला जावं लागेल. 

याच पद्धतीनं कर्ज घेऊन विकत घेतल्या गाडीची नोंदणी प्रमाणपत्र (RC) बँकेच्या नावानं असतं. कर्जाची परतफेड केल्यानंतर आरसी खरेदीदाराच्या नावावर करण्यासाठी आरटीओशी संपर्क साधावा. 

ग्राहकांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर वेळोवेळी आपला सिबिल स्कोअरही तपासणं गरजेचं आहे. कर्जाच्या परतफेडीनंतर अपडेटेशनसाठी ३० दिवसांचा कालावधी बँकेकडून घेतला जातो.