रहीमनंतर आता रामपालच्या मुसक्या आवळणार

 बाबा रहीमला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता यानंतर संत रामपालचा फैसला होणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 29, 2017, 12:31 PM IST
रहीमनंतर आता रामपालच्या मुसक्या आवळणार title=

चंडीगड :  साध्वी बलात्कारप्रकरणी तथाकथित बाबा रहीमला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता यानंतर संत रामपालचा फैसला होणार आहे. 

स्वत:ला संत कबीरांचा अवतार आणि परमेश्वर समजणाऱ्या संत रामपालच्या सतलोक आश्रमातील अवैध कारनाम्याप्रकरणी, हिस्सार कोर्ट आज निर्णय देण्याची शक्यता आहे. 
रहीमला दोषी ठरविल्यानंतर त्याच्या अनुयायांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. त्याप्रमाणे रामपालच्या अनुयायांनी आक्रोश करु नये म्हणून हरियाणातील हिस्सारमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 

कोण आहे बाबा रामपाल ?

स्वत:ला संत कबीरांचा अवतार आणि परमेश्वर घोषित करणाऱ्या रामपालचा जन्म १९५१ मध्ये सोनीपतमधील धनाणा गांवात झाला. रामपाल हरियाणा सरकारच्या जलसंपदा विभागात ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम काम करत होता. नोकरी करता करता रामपालचा संत रामपाल बनला आणि त्याचे हजारो अनुयायी बनले. त्याने करोंथा गावांत सतलोक आश्रम सुरू केला. हरियाणातील हिस्सारजवळच्या बरवालाजवळ हा आश्रम आहे. आश्रमाच्या जमिनीच्या वादामुळे रामपालवर अनेक आरोप आहेत. 

नाट्यमयरीत्या अटक 

रामपालला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. कारण त्याला आश्रमातून बऱ्या बोलाने बाहेर काढणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता.  तरीही पोलिसांनी त्यावर पाळत ठेवत अथक प्रयत्नांती तीन दिवसांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये अटक केली होती. आश्रमाच्या दारावर अॅम्ब्युलन्स नेऊन पोलिसांनी रामपालला थेट अॅम्ब्युलन्समधूनच नेलं. यावेळी बाबा रामपालच्या समर्थकांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केला होता.

काय आहेत आरोप ?

-संत रामपालवर सरकारी कार्यात अडथळे आणि आश्रमात जबरदस्तीने लोकांना बंधक बनवण्याचा आरोप आहे. 
-हिस्सारमध्ये रामपालच्या सतलोक आश्रमात नरबळी गेल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं रामपालला अटकेचे आदेश दिले होते.
-रामपालला आश्रमात घुसून अटक करायला समर्थकांनी पहिल्यांदा जोरदार विरोध केला. त्यानंतर पोलीस आणि समर्थकांमध्येही धुमश्चक्री झाली. यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले.
-रामपाल सातत्याने कोर्टात गैरहजर राहिला. याप्रकरणी कोर्टाने प्रशासनाला धारेवर धरलं होतं. कोर्टाने रामपालविरोधात बेकायदा वॉरंट जारी करत, रामपालला २१ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कोर्टात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.