बहिणीचा विमा उतरवला नंतर केली भावाने तिची हत्या

  अजित विहारमध्ये मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. चक्क भावाने बहिणीची हत्या केली. हत्या करण्याआधी भावाने तिचा विमा उतरवला होता.

Updated: Aug 25, 2017, 08:38 PM IST
बहिणीचा विमा उतरवला नंतर केली भावाने तिची हत्या title=

नवी दिल्ली :  अजित विहारमध्ये मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. चक्क भावाने बहिणीची हत्या केली. हत्या करण्याआधी भावाने तिचा विमा उतरवला होता.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या भावाने आधी बहिणीचा ५० लाखाचा विमा उतरवला आणि त्यानंतर तिची हत्या केली. कारण डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी भावाने टोकाचे पाऊल उचलले. बहिणीच्या विम्याची ५० लाखाची रक्कम मिळविण्यासाठी हत्येचे षडयंत्र रचले. मात्र, यात तो फसल्याने याचा छडा उलगडला. पोलिसांनी त्याला ४८ तासात अटक केली.

बुराडीच्या अजित विहारमध्ये मंगळवारी पहाटे ५ वाजता पोलिसांना एक फोन आला. एका महिलेची तिच्या पतीने हत्या केली, असं फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले आणि हत्याचा उलगडा झाला. अनिता असे या मृत महिलेचे नाव असून ती पाटण्याची रहिवासी आहे. 

पोलीस तपासात अनिताचा भाऊ कमल यानेच फोन केल्याची कबुली दिली आहे. तो आरएमपी डॉक्टर असून शेजारीच प्रॅक्टिस करतो. कमलचे दोन विवाह झालेत. त्याला ८ मुले आहेत. गेल्या चार-पाच वर्षापासून त्याच्यावर १२ लाखाचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडता येत नव्हते. त्यामुळे त्याने आधी बहिणीचा विमा उतरवला आणि हत्या केली, ही बाब पोलीस तपासात उघड झाली.

सप्टेंबर २०१६ रोजी रक्षाबंधनची भेट म्हणून त्याने बहिणीचा ५० लाखाचा विमा उतरवला होता. बहिणीला मुल नसल्याने त्याने विम्यावर स्वत:चे नाव वारस म्हणून नोंदविले होते. विम्याचे हप्तेही त्यानेच भरले होते. मंगळवारी पहाटे संधी साधून तो बहिणीच्या घरात घुसला आणि झोपेत असलेल्या अनिताचा गळा दाबून तिचा खून केला. मात्र, खुनाची कबुली देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी इंगा दाखवताच त्याने गुन्हाची कबुली दिली.