Agnipath Scheme Protest: 'अग्निपथ' विरोधात आंदोलनाचा भडका; आंदोलकांकडून ट्रेन्सची जाळपोळ

केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेची घोषणा करत या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केलं

Updated: Jun 17, 2022, 08:47 AM IST
Agnipath Scheme Protest: 'अग्निपथ' विरोधात आंदोलनाचा भडका; आंदोलकांकडून ट्रेन्सची जाळपोळ  title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेची घोषणा करत या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केलं. मात्र, या योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली होती. एकीकडे या योजनेलाच विरोध होत असताना, सरकारने या योजनेसाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार ही वयोमर्यादा 21 वर्षांवरून वाढवून ती 23 इतकी केली आहे.

गेली दोन वर्षे सैन्यभरती झालेली नाही. केवळ याच कारणामुळे वयाची ही सवलत दिली जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या भरती पासून वयाची मर्यादा ही 21 वर्षे इतकीच राहणार आहे.

दरम्यान लष्करात अग्निपथ भरती योजनेला विरोध सुरुच आहे. आज सलग दुस-या दिवशी विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. बिहारच्या समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी जम्मूतावी गुवाहाटी एक्स्प्रेसला आग लावली. यामध्ये ट्रेनच्या दोन बोगी जळून खाक झाल्या.

हाजीपुर बरौनी रेलखंडच्या मोहिउद्दीननगर स्टेशनवर ही घटना घडली. उत्तर प्रदेशातही या विरोधाचं लोण पोहोचलं आहे. उत्तर प्रदेशात आंदोलकांनी जोरदार तोडफोड केली. पोलिसांनी काही आंदोलकांना स्टेडियममध्ये रोखलं होतं. मात्र आपल्या सहका-यांना सोडवण्यासाठी 200 आंदोलक चाल करुन गेले. 

शेकडो आंदोलकांनी बलिया रेल्वे स्टेशनवर तोडफोडही केली. यावेळी ट्रेनमध्ये प्रवासीही होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी संतप्त आंदोलकांनी दगडफेकही केली.