राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, अखेर ट्रस्टनेच केला खुलासा

अयोध्येत रामल्लाच्या दर्शनावर वाद निर्माण झाले आहेत. देशभरातून आणि जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक खास राम लल्लाच्या दर्शनासाठी येत असून त्याकरीता त्यांच्या कडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.   

Updated: Mar 22, 2024, 08:04 PM IST
राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट, अखेर ट्रस्टनेच केला खुलासा title=

अयोध्येत एकीकडे भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी गर्दी करत असताना दुसरीकडे त्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम मंदिराच्या विश्वस्त मंडळानेच याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

नेमकं काय होत होतं?

अयोध्येत रामलल्लाच्या व्हीआयपी पास आणि सुगम दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेतले जात होते. यामध्ये उत्तर प्रदेशच्या एका पोलिस कॉन्सेबलचाही समावेश होता. ही सगळी बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे. श्री राम मंदिर ट्रस्‍टने याबाबत खुलासा केला आहे. 

रामलल्लाच्या दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारालं जात नाही. तसंच येणाऱ्या भाविकांनी दर्शनासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क देऊन भुलथापांना बळी पडू नये असं आवाहन राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या वतीने करण्यात आलं आहे. 

एसएसपी राज करण नैय्यर यांनी भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या उपेंद्रनाथ या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. अयोध्यातील रामलल्लाचं मंदिर हे देशभरातील लोकप्रिय आणि भव्य मंदिरांपैकी एक आहे, त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने इथे दर्शनासाठी येत असतात. याचाच फायदा घेत काही समाजकंटकांनी रामलल्लाच्या दर्शनाचा बाजार मांडला होता. 

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार येथे दर्शनाकरता  आलेल्या एका विदेशी पर्यटकाला VIP आणि सुगम दर्शनाचं आमिष दाखवत दोन हजार रुपयांना फसवले. त्यामुळे भाविकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, भारतीय संस्कतीत कोणत्याही देवदेवतेच्या दर्शनाकरीता पैसे देण्याची परंपरा नाही. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर दरदिवसाला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची फसवणूक केली जात असे. हे सत्य अखेर उघडकीस आल्यानंतर  राम मंदिर ट्रस्टकडून दर्शनासंबंधित भाविकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. 

राममंदिरातील उघडकीस आलेला प्रकार लाजिरवाणा असून याबाबत आता मंदिर प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकाराचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं स्थानिक पोलिस यंत्रणेने सांगितलं आहे.  लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सहजपणे आणि निशुल्क दर्शन उपलब्ध  आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये असं आवाहन मंदिर प्रशासन करत आहे.