Jio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर

Adani Group in Telecome Sector: गौतम अदानी यांची कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 22, 2024, 07:08 PM IST
Jio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर title=
Adani Group in Telecome Sector

Adani Group in Telecome Sector: मुकेश अंबानींचे जिओ भारतात लॉंच झाल्यानंतर टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये नवा इतिहास रचला गेला. तेव्हापासून जिओचे एकतर्फी राज्य आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावत जिओचे कनेक्शन पोहोचले आहेत. जिओला कोणी स्पर्धकच उरला नसल्याचे दिसत असताना गौतम अदानी यांची कंपनी मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. भारतामध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव 20 मेपासून सुरु होणार आहे. DoT ने यासंदर्भात त्यांना 8 मार्चला नोटीसदेखील पाठवली आहे. 

अदानी ग्रुपचे सर्व्हेसर्व्हा गौतम अदानी यांनी एका मिटींगमध्ये स्पेक्ट्रम लिलावात सहभाग घेण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही यात सहभागी होत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. अशावेळी गौतम अदानी 5जी इंटरनेट सर्व्हिसवर अधिकार प्राप्त करु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच फास्ट इंटरनेट सर्व्हिसमध्ये अदानी ग्रुपची थेट एन्ट्री होऊ घातली आहे. 

आपला व्यवसाय डेटा सेंटरपर्यंत वाढवण्याचा विचार सुरु असल्याचे गौतम अदानी यांनी एका मिटींगमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. यासोबतच ते एआय-एमएल आणि इंडस्ट्रीयल क्लाऊड कॅपेबिलिटीवर देखील काम करणार आहेत. त्यामुळे फास्ट इंटरनेट मार्केटमध्ये अदानींची एन्ट्री होण्याचा बातम्यांना अजून जोर मिळाला आहे. गौतम अदानी यांनी काही दिवसांपुर्वी क्वालकॉमच्या सीईओंसोबत भेट घेतली होती. त्यामुळे टेलीकॉम मार्केटमध्ये अदानींचा जोरदार प्रवेश होऊ शकतो असे म्हटले जात आहे. 

गौतम अदानी यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक फोटोदेखील शेअर केलाय. त्यांनी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करण्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. ते नवी कंपनी घेऊन एन्ट्री करु शकतात, असे काही रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. पण अदानी कंपनीकडूनही याबद्दल कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 

गौतम अदानी यांच्या टेलिकॉम मार्केटमधील एन्ट्रीसंदर्भात कोणती मोठी अपडेट हाती लागली नाही. पण गौतम अदानी यांनी या इंडस्ट्रीत प्रवेश केला तर मुकेश अंबानी आणि सुनील मित्तल यांसारख्या व्यावसायिकांना टक्कर देतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय.