10 लाख बँक कर्मचारी आज संपावर

सलग दुसऱ्यांदा बँक संपावर 

10 लाख बँक कर्मचारी आज संपावर  title=

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँका आठवडाभरात सलगु दुसऱ्यांदा आज बंद राहणार आहेत. 26 डिसेंबर रोजी बँकांनी संप पुकारला आहे. विजया बँक आणि देना बँक यांच्या बँक ऑफ बडोदामधील प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध म्हणून आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी संप पुकारला आहे. 

जवळपास 10 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. बँकिंग उद्योगातील शंभर टक्के कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या संघटनेने संपाची हाक दिली आहे. 

मंगळवारी नाताळची सुट्टी आणि त्याला लागूनच 26 डिसेंबर रोजी बुधवारी संपामुळे असे सलग 2 दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 

आता शाखा व मन्युष्यबळ अपुरे असल्याने शाखा विस्ताराची गरज आहे. मात्र सरकार बँकांच्या विलिनीकरणाचा घाट घालून कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारणामुळे अधिकारी संघनांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

केंद्र सरकारने सप्टेंबरमध्येच  विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशातील तिसरी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला होती. 

बँकाच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर फेरविचार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्तांनी बैठक बोलावली होती. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही.

 त्यामुळे सर्व संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत सरकार आणि बँकांकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नसल्याचं सांगण्यात येत आहे.