राज्यसभेत भाजपचं बळ वाढलं, 10 पैकी 8 जागा बिनविरोध

राज्यसभेत काँग्रेसला मोठा धक्का...

Updated: Nov 2, 2020, 06:54 PM IST
राज्यसभेत भाजपचं बळ वाढलं, 10 पैकी 8 जागा बिनविरोध title=

नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपचं बळ आणखी वाढलं आहे. आज निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. उत्तर प्रदेशात भाजपचे आठ तर समाजवादी पक्ष आणि बसपाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडला गेला आहे. सोमवारी नाव मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचं घोषित केलं. इतिहासात पहिल्यांदाच भाजपची राज्यसभेत स्थिती इतकी मजबूत झाली आहे.

राज्यसभेतील 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपत आहे. यापैकी 3 भाजप खासदार, 4 समाजवादीचे खासदार तर 2 बसपाच्या खासदारांचा समावेश आहे. तर एक काँग्रेस खासदार देखील आहे. राज्यसभेत भाजपला 9 जागा मिळण्याची शक्यता होती. पण भाजपने फक्त 8 उमेदवार उभे केले आणि एक जागा रिकामी ठेवली.

भाजपचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, माजी डीजीपी ब्रिज लाल, नीरज शेखर, हरिद्वार दूबे, गीता शाक्य, बीएल वर्मा, सीमा द्विवेदी या भाजप उमेदवारांची तर समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि बसपाचे रामजी गौतम हे बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

सध्या भाजपचे राज्यसभेत 92 खासदार आहेत. काँग्रेसकडे आता फक्त 38 खासदार आहेत. एनडीएचं राज्यसभेतील संख्याबळ आता 112 इतकं झालं असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना फक्त 10 जागांची गरज आहे. राज्यसभेच्या एकूण खासदारांची संख्या 245 आहे. ज्यापैकी 12 जागा हे राष्ट्रपती नियुक्त असतात.