मोठी बातमी: विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची मंजुरी

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तपासयंत्रणांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Updated: Feb 4, 2019, 09:47 PM IST
मोठी बातमी: विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची मंजुरी title=

नवी दिल्ली: भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तपासयंत्रणांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी विजय मल्ल्याकडे १४ दिवसांची मुदत आहे. डिसेंबर महिन्यात लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. मात्र, या निर्णयाला ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळणे गरजेचे होते. यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. गेल्याच महिन्यात विशेष न्यायालयाने विजय मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. त्यामुळे विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. 

विजय माल्ल्याला चोर म्हणणं चुकीचं - गडकरी

दरम्यान, भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर विजय मल्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. यासाठी कारागृहात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने प्रत्येक बारीक गोष्टीकडे लक्ष दिले आहे. मल्ल्याने हा तुरुंग सुरक्षित नसल्याचा कांगावा केला होता. मात्र, वेस्टमिनिस्टर न्यायालयाने मल्ल्याच्या या आक्षेपाला केराची टोपली दाखविली होती. आर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ मध्ये मल्ल्याला ठेवण्यात येईल. 

भारतीय बँकांनी मला साफ लुटले; कर्जापेक्षा अधिक मालमत्ता केली जप्त

२ मार्च २०१७ ला विजय मल्ल्या दुपारी दीड वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली-लंडन ‘९डब्ल्यू १२२’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या समूहाने याचिका केली होती. मात्र, विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती. यानंतर विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने प्रयत्न सुरु केले होते.