UP Election पराभवानंतर BSP सुप्रिमो मायावती यांनी घेतला मोठा निर्णय

BSP च्या मायवतींनी राज्यातील निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 27, 2022, 05:09 PM IST
UP Election पराभवानंतर BSP सुप्रिमो मायावती यांनी घेतला मोठा निर्णय title=

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Election) झालेल्या दारुण पराभवानंतर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मायावती (Mayawati) यांनी प्रदेशाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही पदे वगळता पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी विसर्जित केली आहे. (Mayawati dissolved the party's entire executive body)

पक्षाच्या या मोठ्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत बसपाने मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली. पक्षाने मेरठमधील मुंकद अली, बुलंदशहरमधील राजकुमार गौतम आणि आझमगडमधील विजय कुमार या तीन मुख्य समन्वयकांचीही नियुक्ती केली आहे.

"2022 च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. मागील निवडणुकीत 2017 मध्येही आम्हाला कमी जागा मिळाल्या असल्या तरी आम्हाला समाजवादी पक्षाच्या तुलनेत 1.9 टक्क्यांनी जास्त मते मिळाली होती," बसपाचे उमाशंकर सिंह यांनी एएनआय सोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

2007 च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत मिळाले होते. मात्र, तेव्हापासून पक्षाची कामगिरी दयनीय झाली आहे. यावेळी, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (BJP) राज्यात पुन्हा सत्तेत आल्याने 12.88 टक्के मतांसह केवळ एक जागा जिंकण्यात बसपाला यश आले.

11 मार्च रोजी मायावती यांनी कबूल केले होते की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव हा "धडा" होता. "आपण त्यातून शिकले पाहिजे, आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि आपल्या पक्षाची चळवळ पुढे नेली पाहिजे आणि पुन्हा सत्तेत यावे," असं ही मायावती म्हणाल्या होत्या.