माजी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे वार झेलणारी महिला उमेदवार आघाडीवर

मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत सर्वाधिक वाद गाजला, तो इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल. हे वादग्रस्त वक्तव्य मध्य

Updated: Nov 10, 2020, 01:37 PM IST
माजी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे वार झेलणारी महिला उमेदवार आघाडीवर title=

भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत सर्वाधिक वाद गाजला, तो इमरती देवी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल. हे वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं होतं. याविषयी कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे देखील तक्रारी झाल्या होत्या. मध्य प्रदेशातील डबरा विधानसभा मतदारसंघातून इमरती देवी यांनी निवडणूक लढवली. इमरती देवी या भाजपाच्या उमेदवार आहेत, त्या आघाडीवर आहेत. प्रतिस्पर्धी सुरेश राजे यांच्यापेक्षा त्या १० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

इमरती देवी यांचा उच्चार आयटम असा केल्याने कमलनाथ अडचणीत आले होते. याविषयी इमरती देवी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. येत्या ४८ तासांत यावर स्पष्टीकरण द्या, असे आदेश दिले होते, पण कमलनाथ यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. यावर कारवाई म्हणून निवडणूक आयोगाने त्यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून काढून घेतलं.

स्टार प्रचारकाच्या दौऱ्याचा खर्च हा पक्षनिधीतून गणला जातो. स्टार प्रचारक नसेल तर संबंधित व्यक्तीच्या दौऱ्याचे पैसे हे उमेदवाराच्या हिशेबात गणले जातात. म्हणून कमलनाथ यांच्यासमोर मोठी अडचण झाली होती. कमलनाथ यांना स्टार प्रचारकमधून हटवल्या प्रकरणी निवडणूक आयोगाविरोधात कमलनाथ हायकोर्टात गेले होते, अखेर कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

कमलनाथ यांनी आयटम म्हणून जे वक्तव्य केलं होतं, त्यावर राहुल गांधी म्हणाले होते, कमलनाथ हे जरी आमच्या पक्षाचे असले तरी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, ते आपल्याला नापसंत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं, तर राहुल गांधी यांचं हे वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं असं उत्तर कमलनाथ यांनी दिलं होतं.