Nitin Gadkari यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं थेट पोलिसांना आव्हान, पाहा कोण आहे जयेश कांथा

बेळगावच्या तुरुंगात असलेला आरोपी आहे खूपच खतरनाक, बंदी असतानाही आरोपीकडे मोबाईल फोन आला कसा? पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Updated: Jan 18, 2023, 07:07 PM IST
Nitin Gadkari यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं थेट पोलिसांना आव्हान, पाहा कोण आहे जयेश कांथा title=

Niting Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन (Threatening phone calls) करणाऱ्या आरोपी जयेश कांथाची पोलीस चौकशीत डायलॉगबाजी सुरू आहे. जयेश कांथा (Jayesh Kantha) या गँगस्टरने 14 जानेवारीच्या दुपारी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल केले होते. मात्र, त्या घटनेच्या तीन दिवसानंतर ही नागपूर पोलीस बेळगाव तुरुंगातून तो मोबाईल फोन (Mobile Phone) हस्तगत करण्यात अपयशी ठरलेयत. जयेशने तो फोन नष्ट केल्याची शंका पोलिसांना आहे. 

जयेश कांथा तपासात सहकार्य करत नसून त्याने धमकीचे फोन का केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? हे सांगायला तो तयार नाही. आरोपी जयेश कांथाने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. 'जाओ पहले फोन ढूंढ के लाओ, फिर मेरी जांच करो' अशी फिल्मी डायलॉगबाजी तो करतोय. फोन सापडल्यानंतर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. जेलमधूनच त्याने याआधी अनेक अधिकारी आणि नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 

कोण आहे जयेश कांथा?
नितीन गडकरी यांना फोन करणाऱ्याचं नाव जयेश कांथा उर्फ शाकिर उर्फ साहिर असं आहे. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका आई आणि मुलाची हत्या केली होती. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तुरुंगात असताना त्याने एकदा पळून जाण्याचाही प्रयत्न केला. जयेश कांथाने नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये फोन करत 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही तर नितीन गडकरी यांच्यासहित कार्यालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली होती. 

तुरुंगात जॅमर असूनही फोन
पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध घेतला असता हा फोन बेळगावमधल्या हिंडाल्गा तुरुंगातून आल्याचं समोर आलं. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपास केला. पण तुरुंगात केवळ 2G जॅमर (Mobile Jammer) लावण्यात आला होता. 4G मोबाईल नेटवर्कवर जॅमरचा कोणताही परिणाम होत नव्हता. आरोपी जयंथ कांथा याने याआधीही काही राजकीय नेत्यांना फोन केल्याचं तपासात स्पष्ट झालं. 

2008 मध्ये दुहेरी हत्या
आरोपी जयेश कांथाने 2 ऑगस्ट 2008 मध्ये पुत्तूर जवळच्या सौम्या नावाच्या महिलेचा आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली होती. हत्येप्रकरणी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पुत्तूरच्या स्थानिक कोर्टाच्या इतिहासत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्याची ही दुसरीच घटना होती. हत्या करण्यात आलेली महिला जयेश कांथाची नातेवाईक होती आणि हत्येनंतर जयेशने तिचं सोनंही लुटलं होतं. 

हत्येनंतर जयेश कांथा फरार झाला. त्यानंतर त्याने आपलं नाव बदलून लग्नही केलं. 2012 मध्ये पत्नीबरोबरच्या भांडणातून त्याला अटक करण्यात आली. यानंतर तोच दुहेरी हत्येच्या घटनेतला आरोपी असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान पोलिसांनी जयेश कांथाकडून अनेकांचे नंबर असलेली एक डायरीही जप्त केली आहे.