भाजपसोबत रहायचे की नाही? चंद्राबाबू नायडू आज घेणार निर्णय

मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला समोरे जावे लगणार आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 4, 2018, 10:50 AM IST
भाजपसोबत रहायचे की नाही? चंद्राबाबू नायडू आज घेणार निर्णय title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षासोबत दोस्ती ठेवायची की नाही याबाबत चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आज निर्णय घेणार आहे. शिवसेनेने भाजपच्या मैत्रीला 'जय महाराष्ट्र' केल्यावर त्याचे पडसाद इतर राज्यांतील भाजपच्या मित्रपक्षांमध्येही उमटायला लागले आहेत. शिवसेना आणि तेलगू देसम हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटकपक्ष आहेत. तर, भाजप केंद्रात सत्तेत. त्यामुळे मित्रपक्षांनीच साथ सोडल्यास भाजपला मोठ्या नाचक्कीला समोरे जावे लगणार आहे.

शिवसेनेचा भाजपला केव्हाच 'जय महाराष्ट्र'

२०१४ आणि त्यानंतर देशभरात झालेल्या अनेक निवडणुकांतील यशामुळे भाजपच्या शिडात सत्तेची हवा भरली गेली. या यश आणि हवेने भाजप भलताच उत्साहीत होऊन गेला. त्यामुळे एनडीएतील घटक आणि मित्रपक्षांसोबतचे भाजपचे वागणे बदलले. केंद्रात सोडाच पण, राज्यातही भाजप मित्रपक्षांना वानगीदाखलही किंमत देत नाही. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाही, असा शिवसेनेसह एनडीएतील काही घटक पक्षांचा आरोप. या आरोपातूनच शिवसेनेने भाजपशी फारकत घेत एकला चलोचा नारा दिला. आता चंद्राबाबूंचा तेलगू देसमही त्या मार्गावर असल्याचे दिसते.

तिसऱ्या आघाडीवरही चर्चा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक रविवारी बोलावली आहे. अमरावती येथे पार पडत असलेल्या या बैठकीत बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस म्हणजेच तिसऱ्या आघाडीबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या आघाडीत चंद्राबाबूंची भूमिका महत्त्वाची 

लोकसभा निवडणुकीस (२०१९) अवघे एकच वर्ष बाकी राहिले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भापज सारख्या राष्ट्रीय पक्षांना बाजूला सारून 'तिसरी आघाडी' स्थापन करवी. तसेच, देशाला आणि देशाच्या राजकारणाला आणखी एक पर्याय द्यावा असा काही पक्षांचा विचार आहे. त्या दुष्टीनेही पुन्हा एकदा हालचाली गतीमान झाल्या आहेत. सुमारे दोन दशकांपूर्वीही चंद्राबाबूंनी असा प्रयत्न करून पाहिलाहोता. भारतीय राजकारणाच्या इतिहासात १९९६मध्ये काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर तिसऱ्या आघाडीचे सरकार सत्तेत आले होते. या सरकारमध्ये चंद्राबाबूंची भूमिका महत्त्वाची राहिली होती.