चांद्रयान -2 चं यशस्वी प्रक्षेपण, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

'चांद्रयान २' अवकाशात झेपावलं.

Updated: Jul 22, 2019, 04:14 PM IST
चांद्रयान -2 चं यशस्वी प्रक्षेपण, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : सारा देश ज्याची वाट पाहात होता तो क्षण अखेर सगळ्यांनी अनुभवला. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून 'चांद्रयान २' अवकाशात झेपावलं. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एम के ३ या प्रक्षेपकानं उड्डाणानंतर बरोबर १५ मिनिटांनी चांद्रयानाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडलं आणि नियंत्रणकक्षातल्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या ताणलेल्या चेहऱ्यांवर पहिलं हास्य उमटलं. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी आपल्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं.

आपल्या कक्षेत स्थिर झाल्यानंतर आता पुढचे २२ दिवस चांद्रयान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. त्यानंतर ते चंद्राच्या दिशेनं आपला प्रवास सुरू करेल. अवकाशात झेपावलेलं हे चांद्रयान सुमारे ४८ दिवसांत चंद्रावर पोहोचणार आहे. ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान चांद्रयान चंद्रावर पोहोचेल, असा अंदाज आहे. पुढचे काही दिवस या चांद्रयानासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. 

भारताची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम असलेलं चांद्रयान २ यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. श्रीहरिकोटामधल्या इस्रोमधून दुपारी २.४३ च्या सुमाराला चांद्रयान चंद्राच्या दिशेनं झेपावलं. सुवर्णाक्षरांनी या क्षणाची नोंद इतिहासात झाली. तब्बल २५ वर्षं या मोहिमेवर काम सुरू होतं. अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी घडल्याचं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं. हा क्षण याचि देही याची डोळा अनुभवण्यासाठी इस्रोमध्ये अनेक लोकांनी गर्दी केली होती.