आजही आम्हाला त्यांची जात ठाऊक नाही; प्रियंका गांधींचं लक्षवेधी वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांवर दिलं चोख प्रत्युत्तर 

Updated: Apr 28, 2019, 05:39 PM IST
आजही आम्हाला त्यांची जात ठाऊक नाही; प्रियंका गांधींचं लक्षवेधी वक्तव्य title=

नवी दिल्ली : काँग्रेसने कधीच पंतप्रधानांच्या खासगी आयुष्याविषयी विधानं केलेली नाहीत, असं म्हणत काँग्रेसच्या महासचिवपदी असणाऱ्या प्रियंका गांधी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाकडून आपल्या जातीचा मुद्दा अधोरेखित केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत प्रियंका यांनी आपलं मत समोर ठेवलं. 

'किंबहुना आजही मला त्यांच्या (पंतप्रधान नरेंद्र मोदींची) जात ठाऊक नाही. विरोधक आणि काँग्रेस हे फक्त विकासाशीच निगडीत मुद्देच उचलून धरत आहेत. आम्ही कधीच त्यांच्यावर खासगी आयुष्यावरुन वक्तव्य केलेलं नाही', असं प्रियंका म्हणाल्या. 

शनिवारी उत्तर प्रदेशातील कनौज येथे आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये पंतप्रधानांनी आपल्या जातीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून वक्तव्य करत तुच्छ लेखलं जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. 'मायावतीजी.... मी मागासवर्गीय वर्गातील आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कृपया मला या जातीच्या राजकारणात खेचू नका', असं म्हणत देशातील जवळपास १३० कोटी जनता हेच माझं कुटुंब आहे ही बाब पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली होती. 

'साऱ्या देशालाही माझ्या जातीविषयी माहिती झाली नसती, जोपर्यंत विरोधकांनी याविषयी वाच्यता केली नसती. मी यासाठी मायावतीजी, अखिलेखजी, काँग्रेसची नेतेंमंडळी यांचा आभारी आहे. कारण ते माझ्या जातीविषयी चर्चा करत आहेत', असं मोदी म्हणाले. एका मागासवर्गीय कुटुंबात जन्माला येणं म्हणजे देशसेवेची संधी मिळणं ही महत्त्वाची बाब अधोरेखित करत आपण धर्माच्या राजकारणावर विश्वास ठेवत नसल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. 

पंतप्रधानांनी केलेल्या या आरोपांनंतर मायावती यांनी त्यांचे हे आरोप फेटाळत मागास जातीच्या मुद्द्यावरुन आपण त्यांना कधीच हिणावलं नसून हे सर्व आरोप खोटे असल्याचं त्या म्हणाल्या. निवडणुकांच्या या रणधुमाळीत मतं मिळवण्यासाठी मागासवर्गीय समाजातील असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी हे जास्तीत जास्त मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते नेहमीच उच्च वर्गातील होते. पण, त्यांच्या कारकिर्दीत गुजरात निवडणुकांमध्ये त्यांनी आपल्या समाजाची गणती ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय़ जातींच्या प्रवर्गात करत राजकीय फायदा घेतला', असं म्हणत मायावती यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. 

लोकसभा निवडणुकांचा एकंदर माहोल आणि दर दिवसागणिक बदलणारे राजकीय रंग पाहता लोकशाहीच्या या उत्सवात आता जातीच्या राजकारणामुळे नेमकं कोणतं वळण येणार याकडेच सर्वसामान्य मतदार जनतेचं लक्ष लागलेलं आहे.