Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक बोलावण्यात आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय.
विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुका होत्या. इंडिया आघाडी या निवडणुका एकत्रितपणे लढवेल, अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसनं मित्रपक्षांना विश्वासात न घेता राहुल गांधींच्या नेतृत्वात स्वबळावर शक्तिप्रदर्शन केलं.
मध्य प्रदेशात इंडिया आघाडी म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव सपा नेते अखिलेश यादवांनी दिला. मात्र काँग्रेसनं हा प्रस्ताव धुडकावला. त्यामुळं अखिलेश यादव नाराज झाले. 6 डिसेंबरच्या बैठकीत मित्रपक्षांची नाराजी उघड होण्याची शक्यता आहे. या पराभवामुळं काँग्रेसला बॅकफूटवर जावं लागेल, अशी चर्चा आहे.
तर ममता बॅनर्जी, नीतीश कुमार, लालूप्रसाद यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव या नेत्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणाराय. त्यातच इंडिया आघाडीची कमान नीतीश कुमारांकडे सोपवावी, अशी मागणी जेडीयू नेते निखिल मंडल यांनी केलीय. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कौल बाजूनं लागला असता तर इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा काँग्रेसचा दावा आणखी मजबूत झाला असता. मात्र फासे नेमके उलटे पडले.
राहुल गांधी कार्ड पुन्हा एकदा फेल ठरलं. आता पराभवाची ठेच लागल्यानंतर तरी काँग्रेस शहाणी होणार का? इंडिया आघाडीचं नेतृत्व इतरांकडे सोपवणार का? हा कळीचा मुद्दा असणाराय. इंडिया आघाडीनं यातून काय धडा शिकते, यावर 2024 लोकसभा निकालाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.