गुजरात निवडणुकांपूर्वी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा?

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 19, 2017, 12:01 AM IST
गुजरात निवडणुकांपूर्वी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा? title=
File Photo

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी सीडब्ल्यूई म्हणचेच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.

२० नोव्हेंबर रोजी होणारी ही बैठक १० जनपथवर सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपद सोपवण्याबाबतचा निर्णय होणार आहे.

तसे झाल्यास तब्बल २० वर्षांनंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवलं जाणार आहे. सोनिया गांधी यांनी १४ मार्च १९९८ रोजी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठिक नाहीये. त्यामुळेच राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येणार असल्याचं कळतयं.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेता जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले की, "काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पद निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी तारीख ठरवण्यात येईल. जर केवळ राहुल गांधींचं नाव अध्यक्षपदासाठी समोर आलं तर नामांकन मागे घेण्याच्या तारीखेला म्हणजेच १ डिसेंबर रोजी अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर करण्यात येईल.