… तर काँग्रेस पुढील ५० वर्षे विरोधी पक्षातच बसेल- गुलाम नबी आझाद

ज्या कोणी व्यक्ती आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहेत तो केवळ आपलं पद जाऊ नये यासाठी तसं करत आहेत. 

Updated: Aug 28, 2020, 08:55 AM IST
… तर काँग्रेस पुढील ५० वर्षे विरोधी पक्षातच बसेल- गुलाम नबी आझाद title=

नवी दिल्ली: जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्ष पहिल्यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो. अन्यथा पुढील ५० वर्षेही काँग्रेस सलग विरोधी पक्षातच बसेल, असे वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी केले. ज्येष्ठ नेत्यांच्या 'लेटरबॉम्ब'मुळे काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या वादावर गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी मौन सोडले. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गुलाम नबी आझादी यांनी काही परखड मते मांडली. त्यांनी म्हटले की, ज्या कोणी व्यक्ती आमच्या या प्रस्तावाचा विरोध करत आहेत तो केवळ आपलं पद जाऊ नये यासाठी तसं करत आहेत. जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल. अन्यथा पुढील ५० वर्षेदेखील काँग्रेस विरोधकांच्याच भूमिकेत दिसेल. 

'...मग तो बेशिस्तपणा नव्हता का?', गुलाम नबी आझाद यांची उघड नाराजी

तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मतं तुमच्या बाजूनं असतात. पक्षांतर्गत निवडणुकीत तुम्ही दोन ते तीन लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मतं मिळणाऱ्या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल. ज्यांना काँग्रेसमध्ये खरंच रस आहे, ते आमच्या बोलण्याचं स्वागत करतील, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. 

काँग्रेसला सक्रीय करणं हीच इच्छा असल्यामुळे २३ जणांनी पत्र लिहिलं. १९७० नंतर काँग्रेस बनवण्यातले आम्ही आहोत. निवडणुकांबाबत ज्यांना माहिती नाही, ते आमच्यावर टीका करत असतील, तर याचं दु:ख जास्त आहे. आम्ही बऱ्याच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसोबत काम केलं आहे, त्यामुळे आमच्यात काहीतरी असेल. जे लोक काहीच करून आले नाहीत,  ते विरोध करत असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.