कर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?

कर्नाटक विधानसभा 2018: भाजपल रोखण्यात कॉंग्रेस होणार यशस्वी?

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 3, 2018, 08:33 PM IST
कर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत भाजपला तोडीस तोड आव्हान उभे केल्यावर काँग्रेसने आपला मोर्चा कर्नाटककडे वळवला आहे. सत्तेत असलेल्या कॉंग्रेससमोर कर्नाटकचा गढ राखणे कॉंग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस आतापासूनच कामाला लागली आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीची रणनितीही काँग्रेसने आखली आहे.

निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांवर 'टीम राहूल'चे लक्ष

अध्यक्ष राहुल गांधी यांची टीम आणि पर्यायाने कॉंग्रेसच्या धुरीणांनी भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. खास कर, 2018मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांवर टीम राहूल बारीक लक्ष ठेऊन आहे. 2018 मध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. लोकसभा आणि देशाच्या राजकारणाचा विचार करता छत्तीसगढ वगळता ही तिनही राज्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात कर्नाटक वगळता सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कर्नाटकची सत्ता राखून इतर राज्यात बाजी मारण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

बूथ लेवलपर्यंत काँग्रेसची मोर्चेबांधणी

महत्त्वाचे असे की, 2018मध्ये विधानसभा निवडणुकांची सुरूवातच कर्नाटकमधून होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडच्या या राज्यात सत्ता कायम राखत विजयी सुरूवात करण्याचा काँग्रेसचा मनसूबा आहे. त्यामुळे काँग्रेस आतापासूनच कामाला लागला आहे. अर्थात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकही सिद्धरमय्या यांचे कर्नाटकातील प्रस्त ओळखून आहेत. पण, तरीही काँग्रेस कोणताही धोका स्विकारायला तयार नाही असे दिसते. म्हणूनच काँग्रेसने अगदी बूथ लेवलपर्यंत मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.

कर्नाटक काँग्रेसची मदार 8 लाख कार्यकर्त्यांवर

निवडणुका जिंकण्यासाठी भाजप नेहमीच काटेकोर नियोजन करते. त्यामुळे 2014 नंतरचा इतिहास विचारात घेऊन काँग्रेसही सावध पावले टाकताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेसने जवळपास आठ लाख कार्यकर्त्यांची फौज तयार केली असून, ही फौज बुथ लेवलला जाऊन काम करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कर्नाटकातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 28 मे 2018ला समाप्त होत आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीपासून काँग्रेस कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी निवडणुक होत आहे.

सहा महिन्यांपासून मोर्चेबांधणीस सुरूवात

प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे प्रभारी जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकमध्य काँग्रेस गेले सहा महिने काम करत आहे. आम्ही प्रत्येक मतदारसंघावर काम करत अहोत. आतापर्यंत आम्ही 98 टक्के बूथ लेवलच्या गटाची स्थापना केली आहे. कर्नाटकमध्ये सध्या 54,200 बूथ गट आहेत. ज्यात आम्ही 53,000 बनवले आहेत. प्रत्येक गटात 15 सदस्य असणार आहेत. काँग्रेसने कर्नाटकमध्ये 7 लाख 95 हजार कार्यकर्ते तयार केले आहेत, अशी माहितीही वेणुगोपाल यांनी दिली आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी तळागाळापर्यंत कार्यकर्ते जमा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. तसेच, पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी जोरदार संघटन उभारण्याचे आदेश प्रादेशिक नेतृत्वाला दिले होते.