Corona Third Wave : देशात कोरोनाचा कहर, ओमायक्रॉनचे रुग्णही हजाराकडे

देशात ओमायक्रॉनने शिरकाव केल्यानंतर कोरोना संसर्गाच्या वेग झपाट्याने वाढला आहे.

Updated: Dec 30, 2021, 04:50 PM IST
Corona Third Wave : देशात कोरोनाचा कहर, ओमायक्रॉनचे रुग्णही हजाराकडे title=

Corona Third Wave : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला आहे. पण 2022 च्या आगमनापूर्वीच देशात कोरोनाच्या वाढत्या संख्येने लोकांच्या उत्साहावर पाणी फेरलं आहे. देशात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 13 हजार154 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी कालच्या तुलनेत तब्बल 4 हजाराहून अधिक आहे. तर गेल्या चोवीस तासात 268 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी देशात कोरोनाचे 9 हजार 195 रुग्ण आढळले होते. कोरोनाबरोबरच देशात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 961 वर पोहचली आहे. यात 263 रुग्णांसह दिल्ली पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्रात 252 ओमायक्रॉन रुग्ण आहेत. 

देशातील सात राज्यात नाईट कर्फ्यू
कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकारांची वाढती प्रकरणे लक्षात घेता, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.  महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे, तसंच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

मुंबईत 144 कलम लागू
पोलिसांनी राजधानी मुंबईत कलम 144 लागू केलं आहे. कलम 144 लागू केल्यानंतर, आता मुंबईत नवीन वर्षाच्या (New Year Celebration) पार्ट्यांना ब्रेक लागला आहे. 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत, पोलिसांनी रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट्स आणि क्लबवर निर्बंध लादले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षांच्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 82 टक्क्यांनी वाढली
मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत तब्बल 82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत येथे 2,510 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दरम्यान 251 लोक बरे झाले आहेत. याआधी मंगळवारी मुंबईत 1377 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.