...म्हणून तो मुलींना पळवून त्यांना पुन्हा घरी सोडत होता

आरोपीनं असं कृत्य करण्यामागचं कारण जाणून घेताना पोलीसही चक्रावले

Updated: Jan 29, 2019, 10:32 AM IST
...म्हणून तो मुलींना पळवून त्यांना पुन्हा घरी सोडत होता title=

नवी दिल्ली : दिल्लीत मुलींच्या अपहरणाचं एक प्रकार समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावून गेलेत. पोलिसांनी एका आरोपीला दोन मुलींच्या अपहरणासाठी अटक केलीय. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं हे दोन अपहरण का केले? याचा खुलासा केला... आणि पोलिसांनाही त्यावर काय बोलावं हे सुचेना... आरोपीचं नाव कृष्ण दत्त तिवारी असं आहे. तो ४० वर्षांचा आहे. व्यवसायानं चालक असलेला तिवारी दिल्लीतल्या राजौरी गार्डन परिसरात राहतो. 

असा झाला प्रकरणाचा खुलासा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी कीर्ति नगरमधील जवाहर कॅम्पच्या एका रहिवाशानं आपली आठ वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी ही मुलगी सुरक्षित घरी पोहचली. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर घराबाहेर एका व्यक्तीनं तिला खेळण्याचं आमिष दाखवतं आपल्या घरी नेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 

पोलिसांनी अधिक तपास करताना घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं... त्यात एक व्यक्ती या मुलीला राजौरी गार्डन परिसरात सोडताना दिसला... त्याचा चेहरा सीसीटीव्हीत दिसल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली... त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं काही दिवसांपूर्वी असंच आणखीन एका मुलीचं अपहरण केलं होतं, हेही पोलिसांना समजलं.

मुलींना कोणतीही हानी नाही

आरोपी कृष्ण दत्त तिवारीची चौकशी केली असता त्यानं आपण रात्री मुलीचं अपहरण केल्यानंतर सुखरुप आपल्या घरी ठेवलं आणि सकाळी तिला तिच्या घराजवळ सोडल्याचं सांगितलं... आपण या मुलीला कोणतीही हानी पोहचवली नसल्याचंही त्यानं कबूल केलं. तसंच दोन महिन्यांपूर्वीही हरी नगर भागातून एका आठ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तीन दिवस आपल्या घरी सुखरूप ठेवल्यानंतर तिलाही आपण घरी सोडल्याचं आरोपीनं कबूल केलं.

...म्हणून केलं मुलींचं अपहरण

आरोपीनं असं कृत्य करण्यामागचं कारण जाणून घेताना पोलीसही चक्रावले. आरोपीनं आपल्याला मुलींची आवड असल्याचं सांगितलं. तिवारीला दोन मुलं आहेत पण मुलगी मात्र नाही... त्यामुळे त्यानं या दोन मुलींचं अपहरण केल्याचं म्हटलं. 

घरी कुटुंबीय या मुली कोण? असा जेव्हा तिवारीला प्रश्न विचारत तेव्हा 'त्या आपल्या मित्राच्या मुली असून तो बाहेर गेल्यानं आपण त्यांना घरी आणल्याची' थापही तिवारीनं मारली होती.