अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट, 'माझ्यासाठी CM पद...'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) यांना ईडीने मार्च महिन्यात अटक केली होती. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान कोर्टाने लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांना जामीन मंजूर केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 12, 2024, 01:54 PM IST
अटक झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवाल यांनी केलं स्पष्ट, 'माझ्यासाठी CM पद...' title=

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना मार्च महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने अटक केली होती. मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल जेलच्या बाहेर आले असून, त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्त प्रचार रॅलीत सहभाग घेतला. तसंच आपली पहिली पत्रकार परिषदही घेतली. 

आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना ईडीने सध्या रद्द केलेल्या दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. 21 मार्चला अटक करण्यात आल्यानंतर भाजपा सतत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत होतं. पण अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी यामागील कारणाचा खुलासा केला आहे.

"माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं नाही. खोट्या केसमध्ये मला गुंतवून मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करण्याचा कट आखण्यात आल्याने मी राजीनामा दिला नाही," असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. 50 दिवस जेलमध्ये असतानाही अरविंद केजरीवाल राजीनामा देत नसल्याने भाजपा सतत त्यांच्यावर हल्लाबोल करत आहे. 

पुढे ते म्हणाले की, "जर पंतप्रधानांना भ्रष्टाचाराविरोधात लढायचं असेल तर त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून शिकलं पाहिजे. आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये पाठवलं असून, यात आमचे स्वत:चे मंत्रीही आहेत". आप ही फक्त एक पक्ष नाही, तर विचार आहे असंही ते म्हणाले. 

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाच्या 4 मोठ्या नेत्यांना जेलमध्ये पाठवत नरेंद्र मोदींनी आप पक्षाला संपवण्याची कोणतीही कसर सोडली नाही असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. सत्येंद्र जैन, मनिष सिसोदिया आणि संजय सिंग यांच्यानंतर अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये जाणारे चौथे मोठे नेते आहेत. 

"त्यांना वाटत आहे की, आमचा पक्ष संपेल, पण आम आदमी हा फक्त पक्ष नसून विचार आहे. जितका ते संपवण्याचा प्रयत्न करतील तितकी आम्ही प्रगती करु", असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

आपण लोकसभा निवडणुकीच्या मध्यात जेलमधून बाहेर येऊ असं कोणालाच वाटलं नव्हतं असं अरविंद केजरीवालांनी समर्थकांना सांगितलं. पण तुम्ही केलेल्या प्रार्थना आणि हनुमानाच्या आशिर्वादाने मी आज तुमच्यात आहे असं ते म्हणाले.