दिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी

अडथळ्यांच्या आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणापासून दिल्ली मुक्त झाली पाहिजे.

Updated: Feb 4, 2020, 07:57 PM IST
दिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी title=

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आगामी काळातील देशाच्या विकासावर प्रभाव पाडेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी द्वारका येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दिल्लीची निवडणूक ही नव्या दशकातील पहिलीच निवडणूक आहे. या दशकावर भारताचे वर्चस्व असेल. मात्र, या विकासाचे भवितव्य दिल्लीच्या निकालांवर अवलंबून असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अडथळ्यांच्या आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणापासून दिल्ली मुक्त झाली पाहिजे, असेही यावेळी मोदींनी म्हटले. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असल्यामुळे भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अगोदरपासूनच दिल्लीत झंझावाती प्रचार करत आहेत. 

आजच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. दिल्लीसारख्या शहराला केवळ एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्यांपेक्षा निश्चित अशी दिशा देणारे सरकार हवे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना दिल्लीच्या जनतेकडून भाजपला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधक नाऊमेद झाल्याचे मोदींनी म्हटले. 

तसेच आम आदमी पक्षाला (आप) दिल्लीतील जनता, शेतकरी आणि प्रवाशांची कोणतीही फिकीर नाही. शहरातील बेघरांना पंतप्रधान निवास योजनेतंर्गत घरे का उपलब्ध करून दिली जात नाहीत? राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ का मिळत नाही? दिल्लीकरांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील प्रकल्पाला राज्य सरकार परवानगी का देत नाही, असे अनेक सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ८ तारखेला मतदान होत आहे. यानंतर ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.