Budget 2024 : कसं असेल यंदाचं बजेट? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिले संकेत, 'या' चार गोष्टींवर सरकारचा फोकस

Interim Budget 2024 : यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitaraman) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jan 26, 2024, 08:02 PM IST
Budget 2024 : कसं असेल यंदाचं बजेट? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिले संकेत, 'या' चार गोष्टींवर सरकारचा फोकस title=
Budget 2024 FM Nirmala Sitaraman

FM Nirmala Sitaraman on Budget 2024 : येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंद होणार आहे. सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) वोट ऑन अकाउंट असणार आहे. त्यावर आता एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठं वक्तव्य केलंय.

हिंदू कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ देत स्पष्ट संकेत दिले आहेत. "जात, धर्म किंवा समुदायाचा भेदभाव न करता लोकांच्या विकासावर भर दिला जाईल, असं मोदी म्हणाले होते. युवक, महिला, शेतकरी आणि गरिबांच्या विकासाबाबत त्यांनी भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारचे लक्ष युवक, महिला, आम्हाला अन्न सुरक्षा देणारे, आमचे शेतकरी आणि गरीब यांच्या विकासावर असेल", असं निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही धर्म किंवा जातीचा भेदभाव न करता त्यांच्या विकासावर आणि उन्नतीवर सरकारचे लक्ष असेल. तसेच कौशल्य विकास, शेतीची साधने तसेच नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असं सीतारामण म्हणाल्या. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्याकडे आता डोळे बारिक करून पाहिलं जातंय. अंतरिम अर्थसंकल्पावर बोलताना सीतारामण यांनी 'युवक, महिला, शेतकरी आणि गरिब वर्ग' यावर फोकस केल्याने अर्थसंकल्पात सरकार मुलभूत सुविधांवर पुन्हा लक्ष देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पामध्ये युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्याआधी हलवा समारंभ बुधवारी 25 जानेवारी रोजी नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची उपस्थिती होती.