...म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलाला जेटलींनी भेट दिली कार

त्यांनी पाडलेला हा प्रशंसनीय पायंडा 

Updated: Aug 25, 2019, 12:21 PM IST
...म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलाला जेटलींनी भेट दिली कार  title=

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. जेटली यांच्या निधनाचं वृत्त कळताच सर्व स्तरांतून त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करण्यात आलं. एक प्रभावी राजकीय नेता असण्यासोबतच ते एक चांगले व्यक्तीही होते. अनेकजणांकडून जेटलींच्या अशाच आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. त्यांची अशीच एक आठवण आहे जी खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून त्यांचं मोठेपण सिद्ध करुन जाते. 

'दैनिक भास्कर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अरुण जेटली हे स्वत:सोबतच त्यांच्या सहकाऱ्यांच्या राहणीमानात कशा प्रकारे सुधारणा करता येतील यावरही भर द्यायचे. त्यांच्या प्रती अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडायचे. स्वत:च्याच कुटुंबाचा एक भाग समजत जेटली सहकारी आणि घरात काम करणाऱ्यांच्याही कुटुंबाची जबाबदारी घेत आणि अर्थातच त्यांचे सहकारीसुद्धा जेटलींना कुटुंबाचाच एक महत्त्वाचा घटक समजत. 

जेटली यांनी एक पायंडाच पाडला होता. ज्याअंतर्गत त्यांची मुलं चाणक्यपूरी येथील ज्या शाळेत शिकत होती, त्याच शाळेत त्यांच्या सहकाऱ्यांचीही मुलं शिकत होती. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कोणाच्याही मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असल्यास स्वत:च्याच मुलांप्रमाणे त्यांच्याही इच्छा पूर्ण केल्या. 

चालक जगन आणि सहाय्यक पद्म यांच्यासमवेत आणखी जवळपास १० सहकारी हे जेटलींशी गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून जोडले गेले आहेत. ज्यांच्यापैकी तिघांची मुलं ही परदेशात शिक्षणही घेत आहेत. 

जेवण्याची व्यवस्था पाहणाऱ्यांची मुलगी घेतेय परदेशात शिक्षण 

जेटली कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था पाहणाऱ्या योगेंद्र यांच्या दोन मुलींपैकी एक ही लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.  तर संसदेत जेटलींच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असणाऱ्या गोपाळ भंडारी नमक सहकाऱ्याचा एक मुलगा डॉक्टर आहे, तर दुसरा इंजिनिअर. सा साऱ्यामध्ये सुरेंद्र नामक सहकारी अतिशय महत्त्वाचे होते, जे घर आणि कार्यालयातील जेटलींच्या दिनचर्येची काळजी घेत असत. अशा अनेक सहकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी त्यांच्या नोकरीपर्यंतच्य़ा प्रत्येक पायरीवर जेटलींनी मोलाचं सहकार्य केलं होतं. इतकच नव्हे, तर त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याच्या मुलाला चांगले गुण मिळाल्यामुळे त्यांच्याकडे असणारी ६६६६ या नंबरची एसेंट कारही भेट स्वरुपात दिली होती, असं म्हटलं जातं. 

आपल्यासाठी काम करणाऱ्या अनेकांच्याच मुलांच्या जबाबदाऱ्या पाहत असतानाच ज्या सहकाऱ्यांची मुलं परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत, त्यांना जेटली यांची पत्नीही खास भेट देऊन प्रोत्साहन देत असे. त्यांची हीच वृत्ती पाहता राजकीय पटलासोबतच खऱ्या अर्थाने दैनंदिन आयुष्यात त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची इतरांवर छाप होती हेच खरं.