कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली

'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'

Updated: May 17, 2018, 06:14 PM IST
कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली   title=

नवी दिल्ली : कर्नाटकात बहुमतासाठी आघाडी करूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसनं आता भाजपचा वचपा काढण्याची तयारी सुरू केलीय. याच्या हालचाली गोव्यात सुरू केल्या आहेत. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं, अशी मागणी गोवा काँग्रेसनं केलीय. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यासाठीही हालचारी सुरू केल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकापाठोपाठ गोव्यातही सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

तर दुसरीकडे बिहारमध्येही राष्ट्रीय जनता दलनं सर्वात मोठा पक्ष असल्यानं राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतलाय. आरजेडीचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळं आता कर्नाटकातल्या राज्यपालांच्या निर्णयाचे इतर राज्यांमध्येही पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे भाजपसमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. 

सत्तासंघर्ष कोर्टात 

कर्नाटकमधील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात  पोहोचलाय. भाजप समर्थक आमदारांची यादी सादर करण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना बजावलीय. याप्रकरणी उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि भाजपच्या वकीलांमध्ये युक्तीवादाचा जोरादार फड रंगला. सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिलेला असला, तरी राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाविषयी काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर अद्याप निर्णय दिलेला नाही. निमंत्रण देण्याआधी राज्यपालांना दिलेली सत्तास्थापनेचा दावा करणारी दोन पत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं येडियुरप्पा आणि भाजपच्या वकीलांना दिले आहेत. या संदर्भातील पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

कर्नाटकात भाजपची सत्ता स्थापन

कर्नाटकात निवडणूक निकालानंतर ४८ तासांच्या सत्ता संघर्षानंतर कर्नाटकात भाजपनं सत्ता स्थापन केलीय. बीएस येडियुरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेत. आता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा सरकारला १५ दिवसांची मुदत आहे. पदाचा भार स्वीकारल्यावर येडियुरप्पांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि जेडीएसला जनतेनं नाकारल्याचंही येडियुरप्पांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.

देशात हुकूमशाही - राहुल गांधी

देशातल्या सगळ्या संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक भरले जातायत, असा आरोप राहुल गांधींनी केलाय... भाजप आणि संघाचे लोक हळूहळू न्यायालयांसह सगळ्या संस्था आपल्या ताब्यात घेतायत, देशात गरिबांचा, दलितांचा आणि महिलांचा आवाज दाबला जातोय, असाही घणाघात राहुल गांधींनी केलाय...तर भारतातही पाकिस्तान आणि आफ्रिकेतल्या देशांसारखी हुकुमशाही निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप राहुल यांनी मोदींचं नाव न घेता केलाय.