16 वर्षीय नातीने छातीवर बसून आजोबांचा गळा दाबला! हत्येचं कारण ठरला मोबाईल; 3 दिवस मृतदेहाबरोबर..

Granddaughter Killed Grandfather: आजोबांची हत्या करुन घरातच मृतदेह लपवल्यानंतर ही 16 वर्षांची मुलगी तब्बल 3 दिवस त्याच घरात राहत होती. सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा सिद्ध केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 2, 2024, 01:04 PM IST
16 वर्षीय नातीने छातीवर बसून आजोबांचा गळा दाबला! हत्येचं कारण ठरला मोबाईल; 3 दिवस मृतदेहाबरोबर.. title=
मुलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे

Granddaughter Killed Grandfather: मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे एका अल्पवयीन मुलीने आपल्या आजोबांची क्रूरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजोबांनी हातातील मोबाईल फोन खेचून घेतल्याच्या रागातून नातीने आपल्या आजोबांना संपवल्याचे समजते. या मुलीने घरात हलवा तयार करुन त्यात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि हा हलवा आजोबांना खायला दिला. हलवा खाल्ल्यानंतर आजोबांना झोप आली. झोपलेल्या अवस्थेतच आपल्या आजोबांना एका मोठ्या बॉक्समध्ये धक्का देऊन या मुलीने त्यांचा गळा आवळून हत्या केली. या मुलीला अटक करुन बालसुधारणा गृहामध्ये पाठवण्यात आलं आहे.

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

हा प्रकार 29 मार्च रोजी उघडकीस आला. ग्वालियर शहरातील माधवगंज पोलीस स्टेशनमध्ये 64 वर्षीय निवृत्त होमगार्ड असलेल्या व्यक्तीचा मृतदेह कृष्णा कॉलिनीमधील त्यांच्याच घरात एका बॉक्समध्ये सापडल्याचं फोनवर कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृत व्यक्तीची नात शेजारांच्या घराच्या छप्परावर लपल्याचं आढळून आलं. वडिलांचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या मुलानेच पोलिसांना फोन करुन दिली होती. आजोबांचा मृतदेह घरात असताना त्यांची नात छप्परावर लपल्याने पोलिसांनी आधी या मुलीवरच संक्षय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. सुरुवातीला या मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

..अन् गुन्हा कबूल केला

आजोबांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान कधी ही मुलगी तिच्या प्रियकराचं नाव घेत होती तर कधी एका टॅक्सी चालकाचं नाव घेत होती. ती वारंवार आपला जबाब बदल असल्याने पोलीसही वैतागले. पोलिसांनी अखेर या मुलीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला. या तांत्रिक तपासाच्या आधारावर तिला पुन्हा चौकशासाठी पोलिसांना बोलावून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. 

आजोबांनी नेमकं केलेलं काय?

अतिरिक्त पोलीस निरिक्षक निरंजन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या व्यक्तीची 16 वर्षीय नात मोबाईल फोनवरुन वारंवार कोणाशी तरी बोलायची. यामुळे तिचे आजोबा तिच्यावर फार नाराज होते. एकदा ती अशीच बोलत असताना आजोबांनी तिचा मोबाईल खेचला आणि तो तोडून टाकला. त्यानंतर त्यांनी नातीला मारहाणही केली. आजोबांनी मोबाईल फोडून टाकल्याने ही मुलगी एवढी संतापली की तिने आजोबांचा जीव घेण्याचा प्लॅन तयार केला.

छातीवर बसून गळा दाबला

आधी या मुलीने झोपेच्या गोळ्या घरी आणल्या. त्यानंतर आजोबांना गरम हलवा करुन देते असं सांगून त्या हलव्यात तिने झोपेच्या 15 गोळ्या टाकल्या. हा हलवा आजोबांना खाऊ घातल्यानंतर आजोबांना झोप येऊ लागली. थोडावेळ खुर्चीवर बसल्यानंतर लघवीला जाण्यासाठी ते उठले असता त्यांची नात त्यांना आधार देण्याच्या बहाण्याने जवळ उभी राहिली. मात्र बाथरुमकडे जाताना वाटेतच तिने एका मोठ्या बॉक्समध्ये आजोबांना धक्का दिला. त्यानंतर त्यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबला. आजोबांचा श्वास थांबेपर्यंत ती त्यांच्या छातीवरच बसून होती.

प्रियकराबरोबर पळून जाण्याचा प्लॅन होता

मरण पावलेल्या आजोबांच्या गळ्यावर नखांचे व्रण आढळून आले आहेत. आजोबांना संपवल्यानंतर या मुलीने या बॉक्सला टाळं लावलं. त्या रात्री ती जेवली आणि झोपी गेली. आजोबांना संपवल्यानंतर 3 दिवस ही मुलगी त्यांचा मृतदेह ठेवलेल्या घरातच राहत होती. या 3 दिवसांमध्ये अनेकदा घराबाहेर फिरायला जायची. तिने आपल्या प्रियकरालाही घरी भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र तिने आपण आजोबांची हत्या केल्याचं त्याला सांगितलं नाही. या तरुणीने प्रियकराबरोबर घरातून पळून जाण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यासाठी तिने एका टॅक्सी चालकाशीही संपर्क साधला होता.

कटात इतरांना अडकवण्याची योजना फसली

चौकशीदरम्यान पोलिसांना चकवा देण्यासाठी या मुलीने कटामध्ये प्रियकर आणि टॅक्सी चालकही सहभागी होता असा बनाव केला. मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे या हत्येमध्ये केवळ मुलीचा सहभाग होता असं स्पष्ट झालं आहे. या मुलीला कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता कोर्टाने मुलीला विदिशामधील बाल सुधारणा गृहामध्ये रवाना केलं आहे.