महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा खलिस्तान्यांचा कट? मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त

काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि खलिस्तानवादी संघटनेचे कार्यकर्ते भिडले होते, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे  

Updated: May 5, 2022, 02:45 PM IST
महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याचा खलिस्तान्यांचा कट? मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त title=

Terrorist Arrested : देशातला खलिस्तानवादी दहशतवाद संपुष्टात आला असा जर तुमचा समज असेल तर ते साफ चुकीचं आहे. हरियाणातल्या (Haryana) कर्नालमध्ये (Karnal) चार खलिस्तानी दहशतवादी पकडण्यात आलेत. त्याहूनही धक्कादायक म्हणजे हे सगळे दहशतवादी मोठ्या प्रमाणात स्फोटकं घेऊन महाराष्ट्रात येत होते. हे दहशतवादी महाराष्ट्राकडे का येत होते? अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हरयाणातल्या कर्नालमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं पकडण्यात आली आहेत. कर्नालमध्ये 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. या चौघांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा, आरडीएक्स, बुलेट्स जप्त करण्यात आली आहेत. हे चौघेही दहशतवादी कुख्यात खलिस्तानी (Khalistani) संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (babbar khalsa international) या संघटनेशी संबंधित आहेत.  

गुरप्रीत सिंह, अमनदीप, भुपेंद्र आणि परमिंदर अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत. गंभीर बाब म्हणजे हे दहशतवादी पंजाबमधून नांदेडकडे निघाले होते. हरयाणातल्या बसताडा टोलजवळ पोलिसांनी चेकपोस्टवर एक इनोव्हा गाडी पकडली. या गाडीच्या तपासणीत या दहशतवाद्यांकडे हा दारूगोळा आढळलाय. 

पकडलेले चौघेही दहशतवादी 20 ते 25 वयोगटातले आहेत. हे सगळेजण हरविंदरसिंग रिंडा या खलिस्तानी दहशतवाद्याशी लिंक आहेत. रिंडा हा कुख्यात दहशतवादी सध्या पाकिस्तानात लपलाय. रिंडा पंजाब सीमेवर मोठ्या प्रमाणात दारूगोळा तस्करी करून पाठवतो. हा दारूगोळा पाठवण्यासाठी कधीकधी ड्रोनचाही वापर केला जातो अशी धक्कादायक माहिती आहे. हा दारूगोळा शेतात साठवून पुढे रिंडा सांगेल त्या ठिकाणी ही डिलिव्हरी पोहोचवली जाते. 

हा सगळा दारूगोळा रोबो आणि बॉम्बविरोधी पथकाने डिफ्यूज केलाय. पंजाबमधील दहशतवाद अजूनही सुप्त स्वरूपात जिवंत असल्याचंच या घटनेतून दिसतंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये शिवसेना आणि सीख फॉर जस्टीस या खलिस्तानवादी संघटनेचे कार्यकर्ते भिडले होते. त्या झटापटीनंतर हे दहशतवादी दारूगोळा घेऊन महाराष्ट्राकडे येत असल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय. 

बब्बर खालसा पुन्हा चर्चेत
यात पुन्हा एकदा चर्चेत आलीय बब्बर खालसा इंटरनॅशनल ही दहशतवादी संघटना. स्वतंत्र खलिस्तान हा या दहशतवादी संघटनेचा अजेंडा आहे. कॅनडा, जर्मनी, यूके आणि भारतात या संघटनेची पाळंमुळं आहेत. निरंकारी पंथातल्या सुंदोपसुंदीनंतर ही संघटना वेगळी झाली आणि स्वतंत्रपणे दहशतवादी कारवाया करायला लागली. 

जथ्थेदार तलविंदरसिंग परमार आणि जथ्थेदार सुखदेव सिंग बब्बर यांनी या संघटनेची स्थापना केली. 23 जून 1985 या दिवशी एअर इंडियाच्या माँट्रियल- लंडन- दिल्ली- मुंबई या कनिष्क नावाच्या विमानात या संघटनेने भीषण स्फोट घडवला. या स्फोटात विमानातले तब्बल 329 प्रवासी ठार झाले होते. तेव्हापासून ही संघटना जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाली. 

खलिस्तानी दहशतवाद संपला वगैरे वाटणा-यांना या घटनेमुळे मोठी चपराक बसलीय. खलिस्तानी दहशतवादी अजूनही परदेशातून इथली सूत्र हलवत आहेत. आणि आता हे संकट अगदी महाराष्ट्राच्या वेशीवर आलंय. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने याचा तपास करण्याची गरज आहे.