5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...

Trending News In Marathi: एका क्षुल्लक गोष्टीमुळं पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आहे. कुरकुरे न दिल्यामुळं पत्नीने थेट घरच सोडले. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 13, 2024, 02:38 PM IST
5 रुपयांच्या कुरकुऱ्यांमुळं पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं, कारण...  title=
husband and wife Fight for Kurkure news today

Trending News In Marathi: पती-पत्नीमध्ये होणारे वाद हे काही नवीन नाही. दोघांमधील वाद ताणल्यानंतर घटस्फोटापर्यंत प्रकरण जाते. कधी कधी दोघांमधील भांडणाचा विषय खूपच क्षुल्लक असतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे घडला आहे. 5 रुपयांच्या कुरकुऱ्यांच्या पाकिटामुळं पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

5 रुपयांचे कुरकुऱ्यांचे पाकिट न मिळाल्यामुळं पत्नीने नाराज होऊन पतीसोबत वाद घातला आहे. पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नी दररोज कुरकुरे मागत होती. रोज रोज कुरकुरे आणून मी वैतागलो होतो. या वरुनच पत्नीने कडाक्याचे भांडण केले. तसंच, पत्नीने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे. पत्नीची तक्रार ऐकून पोलिसही काही वेळासाठी थक्क झाले. सध्या पोलिसांनी पत्नीची तक्रार कौटुंबिक समुपदेश केंद्राकडे पाठवली आहे. समुपदेशन केंद्राने पती-पत्नीचे समुपदेशन करुन दोघांनाही पुढची तारीख दिली आहे. त्याचबरोबर आपापसात वाद मिटवावा यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शाहगंज परिसरात राहणाऱ्या मुलीचा विवाह थाना परिसरात राहणाऱ्या एका मुलासोबत झाला होता. दोघांचा विवाह 2023 रोजी हिंदू रिती-रिवाजांनुसार झाला होता. लग्नानंतर दोघाचंही आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र, पत्नीला सतत कुरकुरे खाण्याची सवय होती. तिच्या या सवयीमुळं पती आणि पत्नी दोघांत सतत वाद होत होते. 

पती-पत्नींमध्ये वाद वाढला

आरोप हा आहे की, पत्नी दररोज कुरकुरे खायची. पती जेव्हा ऑफिसमधून यायचा तेव्हा त्याला कुरकुरेचे एक पाकिट आणायला सांगायची. मात्र एक दिवस पती कुरकुरे आणायला विसरला त्यामुळं पत्नी नाराज झाली. या क्षुल्लक कारणावरुन दोघांचेही भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नी नाराज होऊन निघून गेली. गेल्या दीड महिन्यांपासून ती माहेरीच राहत होती. पती तिला परत येण्यासाठी मनवत होता. मात्र पत्नी अडून राहिली होती. 

अलीकडेच पत्नी पतीची तक्रार करत पोलिस ठाण्यात पोहोचली होती. पोलिसांनी तिची तक्रार समुपदेशन केंद्राकडे पाठवली. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी म्हटलं आहे की, समुपदेशन सुरू असताना पतीने म्हटलं की पत्नीने 5 रुपयांच्या कुरकुरेसाठी वाद घातला. कुरकुरे नाही दिले त्यामुळं पत्नी माहेरी निघून गेली. तर, पत्नीने मात्र हा दावा खोडून काढला आहे. पतीने मारहाण केली म्हणून माहेरी गेली, असा आरोप तिने केला आहे. समुपदेशकाने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला कुरकुरे खाण्याची सवय होती. सध्या दोघांनाही पुढची तारीख देण्यात आली आहे.