अखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत

ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.

Updated: Mar 28, 2020, 12:00 AM IST
अखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत title=
नवी दिल्ली: संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या (Recession)  फेऱ्यात सापडल्याची घोषणा शुक्रवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) करण्यात आली. ही जागतिक मंदी २००९ इतकी किंवा त्यापेक्षाही भयानक असेल, असेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून स्पष्ट करण्यात आले. IMFच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिइव्हा यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आपण जागतिक मंदीच्या पर्वात प्रवेश केल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल, अशी भीती क्रिस्टालिना जॉर्जिइव्हा व्यक्त केली. 
 
मात्र, पुढील वर्षी जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घ्यायला सुरुवात करेल. मात्र, त्यासाठी जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील तरलता (लिक्विडिटी) कायम राखणेही आवश्यक असेल, असे त्यांनी सांगितले.
 
तसेच अचानक आलेल्या या जागतिक मंदीमुळे दिवाळखोरी आणि बुडीत कर्जाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी घेण्यात अडथळे येतील. एवढेच नव्हे यामुळे आपली सामाजिक वीण उसवली जाईल, ही मुख्य चिंता आम्हाला लागून राहिली आहे, असेही क्रिस्टिलिना यांनी सांगितले.
 
ही परिस्थिती ओळखून काही देशांनी अगोदरच आर्थिक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. जेणेकरून त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसणार आहे. या प्रक्रियेत पुढे निघून गेलेल्या देशांनी इतरांना आपले अनुभव सांगण्याची गरज आहे. आतापर्यंत जी-२० देशांनी या संकटातून सावरण्यासाठी तब्बल ५ ट्रिलियन डॉलर्सच्या आर्थिक उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्यावर IMF कडून लक्ष ठेवले जाईल, असेही क्रिस्टालिना जॉर्जिइव्हा  यांनी सांगितले.