देशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले

विजेच्या, पैशांच्या बचतीशिवाय वातावरणात जवळपास 15 कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात आलं आहे.

Updated: May 7, 2020, 11:37 AM IST
देशात अब्जावधी युनिट वीजेची बचत; ८९,१२२ कोटी रुपये वाचले title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात अनेक घरांमध्ये पंखे, लाईट, एसीची गरज नसताना ते बंद करण्याची सवय असल्याचं पाहायला मिळतं. वीज वाचवण्याच्या या सवयीमुळे देशात ज्याप्रमाणात वीज वापरली जाते, त्याच्या जवळपास 10 टक्के वीजेची बचत केली जाऊ शकते. केंद्रीय उर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाने 2018-19 या वर्षात 113 अब्ज युनिट वीजेची बचत केल्याचं सांगितलं आहे. 

एका वर्षात इतक्या वीजेची बचत केल्यानंतर किती कोटी रुपयांची बचत झाली आहे माहितेय? देशात 89,122 कोटी रुपयांची बचत झाली आहे. वीजेच्या बचतीमुळे पैशांची बचत झालीच, त्याशिवाय हवेत, वातावरणात कार्बन डायऑक्साईड जाण्यापासूनही रोखण्यात आलं आहे. जवळपास 15 कोटी टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होण्यापासून रोखण्यात आलं आहे.

पंखा, लाईट, एसी, फ्रीज बंद करणं केवळ हाच वीजेची बचत करण्याचा मार्ग नाही. वीज वाचवण्यासाठी ब्यूरो ऑफ एनर्जी आणि एफिशिएन्सीद्वारा (BEE) सांगण्यात आलेल्या मार्गांचा अवलंब केल्यास वीजेची बचत केली जाऊ शकते. 113 अब्ज युनिट वीज याचप्रमाणे वाचवण्यात आली आहे. ब्यूरो ऑफ एनर्जी आणि एफिशिएन्सी ही उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी सरकारी संस्था आहे.

उर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलईडी लाईटचा वापर करणं, स्टार रेटिंग असणाऱ्या उपकरणांचा वापर करणं, एसीचं तापमान 24 डिग्री ठेवणं, घरात किंवा विमानात अशाप्रकारे बदल करणं जेणेकरुन नैसर्गिक प्रकाश अधिक येईल, अशाप्रकारच्या उपायांनी वीजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय नियम COP-21नुसार, भारताला 2030 पर्यंत 35 टक्के वीजेची बचत करायची आहे. हे 35 टक्के 2005 च्या वीजेच्या वापराच्या आकडेवारीवर आधारित असेल. आतापर्यंत देशाला 20 टक्के वीजेची बचत करण्यात यश मिळालं आहे. वीजेची बचत केल्याने केवळ आपल्या घरातील वीज बिल कमी येत नाही, तर याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होतो.