भारतमातेचा वीरपूत्र! अवघ्या 19व्या वर्षी सीमेवर लढताना जवान शहीद

सीमेवर लढताना आलं वीरमरण, अवघ्या 19 व्या वर्षी जवान निखिल शहीद

Updated: Jan 30, 2021, 12:13 PM IST
भारतमातेचा वीरपूत्र! अवघ्या 19व्या वर्षी सीमेवर लढताना जवान शहीद title=

अलवर: 19 व्या वर्षी साधारण आपण कॉलेज आणि मजामस्ती करण्यात दंग असतो. मात्र याच वयात एका युवकानं देशासाठी वीरमरण पत्करलं आहे. इतक्या लहान वयात त्यांनी आपले प्राण भारतभूमीसाठी अर्पण केले. भारत-पाकिस्तान सीमेवर शुक्रवारी शस्रसंधीचं उल्लंघन झालं. या दरम्यान 19 वर्षेचे जवान निखिल दायमा देखील ड्युटीवर होते.

पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असताना त्यामध्ये शहीद झाले आहेत. या चकमकीदरम्यान निखिल यांना वीरमरण आलं. त्यांचे पार्थिव शनिवारी जम्मू-काश्मीरहून दिल्लीला रवाना होणार आहे. तर दिल्लीहून मूळगावी रवाना होईल.

जवान निखिल दायमा यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात त्याच्या मूळगावी सैदपूर इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्वीटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. निखिल यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. निखिलच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत असंही त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

वयाच्या 19 व्या वर्षी जवान निखिल यांना सीमेवर लढताना वीरमरण आलं आहे. निखिल हे राजस्थानच्या भिवाडी परिसरातील सर्वात तरुण जवान होते. जवान निखिल दायमा यांनी एप्रिल 2019 मध्ये 3 राजपूत रेजिमेंटमध्ये सहभागी झाले होते. शुक्रवारी सीमेवर पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. त्यावेळी शत्रूला चोख प्रत्युत्तर देत असताना निखिल यांना वीरमरण आलं.

शहीद निखिल दायमा यांचे वडील टॅक्सी चालक आहेत. तर लहान भाऊ चंदन दायमा भिवाडी येथे सध्या 10वीमध्ये शिकत आहे. शहीद निखिल यांचे आजोबाही सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडून निखिल यांना सैन्यदलात जाण्याची प्रेरणा मिळाली होती.

सैन्यदलात भर्ती झाल्यानंतर दोन वर्षांतच त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं. वयाच्या 19 व्या वर्षात त्यांनी शत्रूंसोबत लढताना त्यांना वीरमरण आलं. त्यांचं पार्थिव आज दिल्लीमध्ये आणलं जाणार असून तिथून मूळगावी रवाना होणार आहे.